महायुतीत अर्थखात्यासाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा अर्थखाते राष्ट्रवादीला देण्यास विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे दिसून आलं. त्यामुळे अर्थखाते कुणाच्या पारड्यात पडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु या घडामोडीवरून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचा दावा केला जात आहे. यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं भाष्य केलं आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी महायुतीमधील अंतर्गत राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. महायुतीविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘ राज्यात सर्व काही चांगलं सुरू असताना महायुतीबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत’. बावनकुळे पुढे म्हणाले, ‘सकारात्मक भूमिका घेतल्यास राज्यात पक्ष वाढू शकतो. सकारात्मक भूमिका घेतल्याने महाराष्ट्रात यश मिळू शकते. नकारात्मक भूमिका घेतल्यास महाराष्ट्र साथ देत नाही, हे विरोधी पक्षांना कळलं नाही, हे दुर्दैव आहे’.
‘ठाकरेंना आंदोलन करण्याचा अधिकार आहे . मागच्या काळात प्रभू रामांच्या भक्ताबद्दल काही भूमिका आणि वक्तव्य केलं, हे त्यांनी चेक करावं. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात काय-काय झालं, हे तपासून घ्यावं. जेव्हा भगवे फडकवण्याची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानचे झेंडे फडकले. जेव्हा भगवान रामचंद्राची गजर करण्याची वेळ आली, तेव्हा मतांचं लांगुनचालून केलं. या नेत्यांच्या पाच वर्षांत भूमिका कशा बदलल्या, हे पाहावे. आता मताची व्होट बँक गेली. मुख्यमंत्री असताना भूमिका वेगळी, सत्ता असताना भूमिका वेगळी. सत्ता गेल्यावर भूमिका वेगळी. महाराष्ट्र हे कधीच सहन करत नाही. प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारणाचा अड्डा करण्याचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे पुढे म्हणाले. राज्य सरकारची साडी वाटपाची योजना बंद करण्यात आली आहे. त्यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, ‘एखाद्या वर्षी काही कारणामुळे बंद असतील. सुरू करण्यासंदर्भात एकनाथ शिंदे पुन्हा निर्णय घेतील’.