आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप – Marathi News | Jhimma director hemant dhome reaction on cjp protest in delhi rahul gandhi dragged by police


नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधातील कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात तरुण आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केलं. लोकसभेतील विरोधी पक्षतेने राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी-वढेरा आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानाबाहेर दोन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केलं. या निदर्शनामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या. यावेळी राहुल गांधींशी सरकारची झालेली चर्चा निष्फळ झाल्यानंतर पोलिसांनी काँग्रेससह इतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याचेच फोटो शेअर करत मराठमोळा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘भारताचा विरोधी पक्षनेता असा उचलून नेणाऱ्या अहंकारी सरकारचा अंत आता जवळ आला आहे. आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार हे नक्की,’ असं त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय. तर ‘भारताच्या विरोधी पक्ष नेत्याला असं उचलून नेणाऱ्या अहंकारी सरकारला आता जनताच उचलणार! आता गर्वाचे घर खाली होणार! देश बघतोय, सगळं बघतोय,’ अशी पोस्ट त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिली आहे. यावेळी हेमंत ढोमेनं अमिताभ बच्चन यांचं एक जुन ट्विटसुद्धा रिपोस्ट करत त्यांना टोला लगावला आहे. 2012 मध्ये बिग बींनी सोशल मीडियावर दिल्लीतल्या आंदोलनावर ट्विट केलं होतं. तेच ट्विट शोधून काढत हेमंतने ’14 वर्षांपूर्वी’ असा टोला लगावला आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट-

दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधींनी सुरुवातीला नीट प्रकरणावर संसदेत चर्चेची मागणी केली होती. सरकारने त्याची तयारीही दाखवली होती. पण त्यानंतर काँग्रेसने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. मात्र राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान आपली मागणी बदलल्याचा आरोप केला. दिल्लीतल्या या आंदोलनवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक सेलिब्रिटीही त्यावर मोकळेपणे व्यक्त होत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *