अभिजीत दिपके यांना राजकीय पक्षाची ऑफर, थेट अध्यक्षपद मिळणार… प्रस्ताव कुणाचा? – Marathi News | Ramdas athawale political offer rpi national youth president to abhijit dipke


कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. राजधानी दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता अभिजीत दिपके हे भविष्यातील योजनांवर काम करत आहेत. त्यांना याआधी अनेकदा राजकारणात येणार का असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मात्र त्यांनी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. असं असलं तरी आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिपके यांना आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. आठवले यांनी दिपके यांना थेट राष्ट्रीय युवा अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. आठवले यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

दिपके यांनी रिपब्लिक पक्षात यावं…

मंत्री रामदास आठवले यांनी भंडारा येथे बोलताना म्हटले की, ‘अभिजीत दिपके हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे आहेत. त्यामुळे अभिजीत दिपके यांनी कॉक्रोज जनता पार्टी चालविण्यापेक्षा त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. जिथे अन्याय होतो तिथे आम्ही नक्कीच उभं राहू. अन्याय झाला तरी, अन्याय करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठीचं आमची सत्ता आहे.’

दिपकेंना राष्ट्रीय युवा अध्यक्षपद देण्यास तयार – आठवले

पुढे बोलताना आठवले यांनी म्हटले की, ‘आम्ही सत्तेत आहोत म्हणजे आम्ही सगळे प्रश्न विसरलो असं नाही. त्यामुळे दिपके सारख्या नवतरुणांना रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा. त्याच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देताना दिपके यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय युवा अध्यक्षपद देण्याची माझी तयारी आहे. वेळ आल्यास याबाबत मी त्यांच्याशी नक्कीच चर्चा करणार असून त्यांनीही याचा विचार करावा. आठवले यांनी पुढे बोलताना नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात सलग महिनाभर तीव्र आंदोलन छेडून देशभरातील तरुणांमध्ये जागृती निर्माण केल्याबद्दल दिपके यांच्या कार्याचे विशेष कौतुक केलं आहे.

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी राजकारणात प्रवेश करण्यास अनेकदा नकार दिला आहे. त्यामुळे आता रामदास आठवले यांनी दिलेली ही ऑफर दिपके स्वीकारतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *