
आपल्या आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडली की त्यासाठी आपण नशिबाला कारणीभूत ठरवतो. पण जर शास्त्रानुसार पाहायला गेलं की कळेल यामागे नक्की काय कारणे आहेत. शास्त्रानुसार, आपल्या अशा काही सवयी आहेत ज्या आपल्याच दुर्दैवाच्या जबाबदार असतात. या सवयी वास्तू दोषासाठी कारणीभूत ठरतात.

आपल्यातील छोट्या छोट्या वाईट सवयी वास्तू दोषाला कारणीभूत ठरतातच, नंतर त्यामुळे मानसिक, कौटुंबिक, आर्थिक तणावाचे कारण बनतात. जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वास्तू दोषांसाठी कारणीभूत ठरतात.

सकाळी उशिरा उठणे : सूर्याला ऊर्जेचं प्रतीक मानलं जात. शास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या आधी उठणं शुभ मानलं जातं. सूर्योदयाच्या आधी उठल्याने मन प्रसन्न राहते, आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते.

दुसऱ्यांचे कपडे घालणे : शास्त्रानुसार, दुसऱ्यांचे कपडे घातल्यास त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा आपल्यात येऊ शकते. आणि यामुळे नैराश्य, चिडचिड, मानसिक अस्थिरता यांसारखे परिणाम होतात.

नखं दाताने कुरतडणे : शास्त्र तसेच ज्योतिषशास्त्रानुसार नखं दाताने चावणे ही वाईट सवय माणसाच्या एकाग्रतेवर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. या सवयीमुळे मोठ-मोठे निर्णय घेण्यात चुका होऊ शकतात.

अंथरुणावर बसून जेवणे : शास्त्रानुसार अंथरुणावर बसून जेवण करणे म्हणजे राहू ग्रहाला प्रभावित करणे, त्याने भ्रम आणि तणाव निर्माण होतो.

दक्षिण दिशेला बसून जेवणे : तसेच दक्षिण दिशेला बसून जेवण करू नये याचा संबंध यम आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो.

घरातील पसारा : वास्तूशास्त्रानुसार ज्यांच्या घरी पसारा असतो, त्यांच्या घरात कोणत्याही वस्तू जागेवर नसतात अशा घरी दारिद्र्य येते. याचा परिणाम वारंवार नैराश्य येतं, आजारपण ओढवतं, आणि अशांतता जाणवते.

झाडांची जागा : होम डेकॉरसाठी फक्त झाडे न लावता त्यांना योग्य जागेवर लावणं खूप गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, तुळस आणि मनीप्लँटसारखी झाडे घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावीत.

तुटलेल्या वस्तू ठेवणे : वास्तुशास्त्रानुसार, तुटलेल्या वस्तू घरी ठेवणे म्हणजे दुर्दैव ओढवून घेणे. तुटलेले काचेचे ग्लास, आरसा, शोभेच्या वस्तू हे घरी ठेऊ नये, यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 22 Sep 2026 03:59 PM (IST)