Tukaram Mundhe : “साहेब येणार आहेत…!” तुकाराम मुंढेंच्या नुसत्या नावानेच बाजारपेठा गपकन बंद; भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले!


बुलढाणा : राज्यातील धडाडीचे आणि कडक शिस्तीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळताच राज्यात कारवाईचा प्रचंड धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या धडक कारवाईचा धास्ती एवढी आहे की, साहेब तपासणीसाठी येणार असल्याच्या केवळ एका अफवेने राज्यातील मोठ्या बाजारपेठा काही मिनिटांत कुलूपबंद होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगाव येथे सोशल मीडियावर ‘एफडीएचे साहेब येणार’ असा मेसेज फिरताच संपूर्ण बाजारपेठ काही मिनिटांत बंद झाली. किराणा, मिठाई दुकानांसह पानटपऱ्या आणि हॉटेल्स चालकांनी दुकाने बंद करून पळ काढला.

FDA Action Buldhana : किराणा दुकानदार, मिठाईवाले पळाले

अनेक छोटे मोठे व्यावसायिक हॉटेल्स, पान टपरी, गुटखा व पान मसाल्याची दुकाने, एवढेच नाही तर अनेकांनी किराणा दुकाने, मिठाईची दुकाने बंद करून पोबारा करण्यातच धन्यता समजली. आता तुकाराम मुंढेंच्या आदेशाने अन्न आणि औषध प्रशासनाचा बडगा ग्रामीण भागातही उभारल्या जाऊ लागल्याने अनेक भागात भेसळ करणारे छोटे मोठे व्यावसायिक धास्तावले आहेत.

अवैध गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्या टपरी चालकांमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. रविवारी परळीमध्ये एफडीएचं पथक कारवाई करणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी बीडमध्ये पसरली. त्यानंतर बीडमधील बहुतांश पानटपऱ्या चालकांनी कारवाई होण्यापूर्वीच आपल्या टपऱ्यांना कुलूप ठोकले.

MCOCA Charges Gutkha Pan Masala : ‘मकोका’च्या इशाऱ्याची धास्ती

राज्यात अवैध गुटखा आणि पानमसाल्याची विक्री रोखण्यासाठी आयुक्त मुंढे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता गुटख्याचे उत्पादन करणाऱ्यांपासून ते अगदी किरकोळ विक्री करणाऱ्या टपरी चालकांपर्यंत सर्वांवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या कठोर निर्णयामुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Tukaram Mundhe On Hospital Pharmacies : औषधांसाठी बळजबरी केल्यास कारवाई!

औषध विक्रीच्या नावाखाली रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी एफडीए आयुक्तांनी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता कोणतीही हॉस्पिटल्स रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्याच अंतर्गत असलेल्या फार्मसीमधून औषध खरेदी करण्यासाठी सक्ती करू शकत नाहीत. या संदर्भातील अधिकृत आदेश त्यांनी जारी केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर थेट परवाना रद्द करण्याची कडक कारवाई केली जाणार आहे.

FDA Action On Nanded Medical Store : नांदेडमध्ये रुग्णाला दिल्या मुदत संपलेल्या गोळ्या

नांदेड शहरातून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील डॉक्टर लेन भागातील एका नामांकित मेडिकल स्टोअरमधून रुग्णाला थेट मुदत संपलेल्या (Expired) गोळ्या विकल्या गेल्या. परडवाडी येथील रहिवासी हनुमंतराव मारोतराव वनाळेकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यांनी कोणत्याही स्थानिक दबावाला बळी न पडता थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना ईमेलद्वारे पुराव्यांसह लेखी तक्रार पाठवली. या गंभीर तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नांदेडमधील संबंधित मेडिकल स्टोअरवर धाड टाकून औषधा साठ्याची तपासणी सुरू केली असून, सदर मेडिकलवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

तुकाराम मुंढे यांच्या या प्रशासकीय बडग्यामुळे ग्रामीण भागातील भेसळयुक्त व्यावसायिक, काळाबाजार करणारे आणि औषध क्षेत्रातील अनैतिक नफेखोरी करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *