Short Films: आज सोमवार आहे. वीकेंड संपला आणि पुन्हा रोजचं रुटीन सुरू झालंय. कामावरून मेट्रो किंवा बस पकडून घरी जाताना दिवसाचा थकवा घालवण्यासाठी प्रवासात थोडा मूड फ्रेश करायचा असेल तर तुमच्यासाठी 10 भन्नाट शॉर्ट फिल्म्सची यादी आहे. या शॉर्ट फिल्म्स पाहण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. यातील काही फिल्म्स अवघ्या 5 ते 15 मिनिटांच्या आहेत, मात्र त्यांच्या कथा शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतील. त्यामुळे ऑफिसनंतर किंवा प्रवासात या फिल्म्स पाहा आणि मूड फ्रेश करा…
ज्यूस (2017)
‘ ज्यूस’ ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील पार्टीची कथा आहे. घरातील पुरुष आरामात बसून दारू आणि गप्पांमध्ये व्यस्त आहेत, तर महिला मात्र उकाड्यात स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी जेवण बनवत आहेत. या शॉर्ट फिल्ममधून घरातील महिला आणि पुरुषांमधील असमानता तसेच पुरुषी मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
IMDb रेटिंग: 8.4/10
दिग्दर्शक: नीरज घेवान
मुख्य कलाकार: शेफाली शाह, मनीष चौधरी, किरण खोजे
टू (1964)
संवाद नसलेली ही शॉर्ट फिल्म दोन वेगवेगळ्या जगात राहणाऱ्या मुलांची कथा सांगते. एक श्रीमंत मुलगा आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर पाहत असतो, तर दुसरा मुलगा झोपडीत राहतो. दोघेही आपल्या खेळण्यांच्या माध्यमातून एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतात.
IMDb रेटिंग: 8.0/10
दिग्दर्शक: सत्यजित रे
मुख्य कलाकार: रबी घोष, रवी किरण कार्ला, स्वपन मुखर्जी
चटनी (2016)
सस्पेन्स आणि ड्रामाने भरलेली ‘चटनी’ तुम्हाला एकच प्रश्न विचारायला भाग पाडते, जे दिसतंय तेच खरं आहे का? गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका सामान्य महिलेभोवती या फिल्मची कथा फिरते. मात्र तिच्या साध्या दिसणाऱ्या आयुष्यामागे अनेक रहस्य दडलेली आहेत आणि त्यातून कथा एक वेगळंच वळण घेते.
IMDb रेटिंग: 7.7/10
दिग्दर्शक: ज्योती कपूर दास
मुख्य कलाकार: तिस्का चोप्रा, रसिका दुग्गल, आकाश भारद्वाज
द बायपास (2003)
राजस्थानच्या एका निर्जन बायपासवर घडणारी ही सायलेंट क्राइम-थ्रिलर आहे. दोन लुटारू आणि एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची कथा यात दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फिल्ममध्ये एकही संवाद नाही. तरीही गुन्हेगारी आणि हिंसाचाराचे प्रसंग अत्यंत प्रभावीपणे कथा पुढे जाते.
IMDb रेटिंग: 7.6/10
दिग्दर्शक: अमित कुमार
मुख्य कलाकार: नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, सुंदर दान देथा
इंटीरियर कॅफे नाइट (2014)
कोलकात्यातील एका कॅफेमध्ये घडणारी ही कथा प्रेम, दुरावा आणि पुन्हा एकदा भेटण्याभोवती फिरते. दोन वेगवेगळ्या नात्यांच्या माध्यमातून जुनं प्रेम आणि नवीन नात्यांची गोष्ट सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे.
IMDb रेटिंग: 7.6/10
दिग्दर्शक: अधिराज बोस
मुख्य कलाकार: नसीरुद्दीन शाह, शेरनाज पटेल, श्वेता बसु प्रसाद
अनुकूल (2017)
सत्यजित रे यांच्या कथेवर आधारित ‘अनुकूल’ ही सायन्स-फिक्शन ड्रामा शॉर्ट फिल्म आहे. माणूस आणि रोबोट यांच्यातील नातं या फिल्ममध्ये दाखवण्यात आलं आहे. रोबोट हळूहळू माणसांची जागा घेऊ लागतात, तसतसे त्यांना स्वीकारण्याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित होतात.
IMDb रेटिंग: 7.5/10
दिग्दर्शक: सुजॉय घोष
मुख्य कलाकार: परमब्रत चट्टोपाध्याय, बरुण चंदा, एकावली खन्ना
दॅट डे आफ्टर एव्हरीडे (2013)
दररोज होणाऱ्या छेडछाडीला कंटाळलेल्या महिलांची कथा या फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे. कथा तीन महिलांभोवती फिरते, ज्या रोजच्या या त्रासाला सामोरं जात असतात. मात्र एका टप्प्यावर त्या आपल्या परिस्थितीसमोर हार न मानता त्याचा सामना करण्याचा निर्णय घेतात.
IMDb रेटिंग: 7.4/10
दिग्दर्शक: अनुराग कश्यप
मुख्य कलाकार: राधिका आपटे, गीतांजली थापा, अरण्या कौर
तांडव (2016)
‘तांडव’ची कथा हेड कॉन्स्टेबल तांबे याच्याभोवती फिरते. वैयक्तिक आयुष्य आणि नोकरीतील समस्यांमध्ये तो अडकलेला आहे. गणपती विसर्जनाच्या गोंगाटाने भरलेल्या रात्री ड्युटी करताना त्याच्यावरचा ताण वाढत जातो. या सगळ्यामुळे त्याच्या मनात साचलेला राग कसा बाहेर पडतो, हे फिल्ममध्ये दाखवलं आहे.
IMDb रेटिंग: 7.3/10
दिग्दर्शक: देवाशीष मखीजा
मुख्य कलाकार: मनोज बाजपेयी, विभावरी देशपांडे, आनंद अलकुंटे
ट्यूबलाइट का चांद (2010)
कोलकात्याच्या रस्त्यांवर राहणाऱ्या एका छोट्या मुलाची ही हळवी कथा आहे. या मुलाला चंद्राचं आकर्षण असतं आणि तो चंद्राला मिळवण्याचं स्वप्न पाहतो. त्याची निरागसता आणि चंद्राला गाठण्याचा त्याचा गोड प्रयत्न या फिल्ममधून पाहायला मिळतो.
IMDb रेटिंग: 7.3/10
दिग्दर्शक: श्लोक शर्मा
मुख्य कलाकार: मास्टर मोहम्मद शारिक
कृति (2016)
‘कृति’ ही सायकोलॉजिकल थ्रिलर शॉर्ट फिल्म आहे. सापन नावाच्या एका व्यक्तीला कृति नावाच्या मुलीवर प्रेम होतं. मात्र कथा जसजशी पुढे जाते, तसतसा एक मोठा प्रश्न निर्माण होतो की कृति नावाची मुलगी खरंच अस्तित्वात आहे की ती केवळ सापनच्या मनाची कल्पना आहे?
IMDb रेटिंग: 7.2/10
दिग्दर्शक: शिरीष कुंदर
मुख्य कलाकार: मनोज बाजपेयी, राधिका आपटे, शांतनू श्रीकांत भाके