Sanjay Raut : ‘गुमशुदा की तलाश’, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवलेत.. – राऊतांची खोचक टीका – Marathi News | Sanjay Raut Slams PM Modi, Amit Shah for Skipping Parliament: ‘No Right to Office?


संजय राऊतांचा मोदी- शहांना टोलाImage Credit source: TV9

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 2 आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं संसदेमध्ये दर्शन नाही. मग एवढे कोट्यावधी पैसे खर्च करून नवी संसद का उभारली ?  संसद इन्स्टाग्रामवरच चालवा ना असा टोला लगावत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला घाबरतात, त्याना पदावर राहण्याचा अधिकार आहे का ? असा थेट सवाल विचार राऊतांनी टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले राऊत ? 

आज आम्ही सगळ्यांनी ठरवलंय जाहिरात द्यायची ‘गुमशुदा की तलाश’..हरवले आहेत, देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह, यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशाकरता चालवताय? इन्स्टाग्रामवरच चालवा ना संसद, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशाकरता उभी केली? मोदींनी 20 हजार कोटी रुपये खर्च करून ? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल, मग नव्या संसदेचं निर्माण केलं कशाकरता, फक्त तुमची पाटी लावण्यासाठी ? जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला टरकतात, त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार आहे का ?  असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

जे गृहमंत्री मोठमोठ्या बाता मारतात, धमक्या देता ईडी-सीबीआयच्या. ते गृहमंत्री देशाच्या संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का ? याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

अमित शहांवर साधला निशाणा 

आज आम्ही त्यांना पुन्हा बोलावण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा आमचा उपक्रम, ती मागणी चालूच राहील. हे महाशय परवा पुण्यात होते, रात्रीच्या काळोखात पुण्यात गेले. तिथे त्यांच्याविरोधात निदर्शनं झाली, आज दिल्लीत त्याच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. जनतेला सामोरं जा ना.. जनतेल तुम्ही सामोरं का जात नाही. तुम्हाला जर लोकांनी खरोखर निवडून दिलं असेल, तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. आणि जर तुम्ही चोऱ्यामाऱ्या  करून, लफंगेगिरी करून , व्होटचोरी करून, दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळत्ये, एवढंच मी सांगेन, अशी टीका राऊत यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *