Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: ‘सैराट’ (Sairat Marathi Movie) फेम अभिनेता अरबाज शेखनं (Actor Arbaz Shaikh) त्याच्या इन्स्टा हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून आपल्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात. या व्हिडीओमध्ये तो एक अभिनेता म्हणून नाहीतर, एक लेक म्हणून मदतीची याचना करताना दिसतोय. ज्या बापानं वेळीच पोटाला चिमटा काढून लहानाचं मोठं केलं, त्याच बापाच्या उपचाराचा खर्च जेपेना म्हणून हतबल झालेल्या लेकानं आर्थिक मदतीचं आवाहन करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज शेखनं रुग्णालय प्रशासनाच्या सक्तीवरही बोट ठेवलंय. अरबाजनं ज्या रुग्णालयात वडिलांना दाखल केलंय, त्या रुग्णालयानं त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घेण्याची सक्ती केल्याचं त्यानं सांगितलंय. काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांनी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधं आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून (मेडिकल) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर करावाईचा इशारा दिलेला. त्यानंतरही रुग्णालयानं अभिनेत्यावर केलेली सक्ती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, या रुग्णालयावर कारवाई करा, अशा कमेंट्सही अरबाज शेखच्या व्हिडीओवर (Arbaz Shaikh Video) करण्यात आल्या आहेत.
मराठी अभिनेता अरबाज शेख (Marathi Actor Arbaz Shaikh) यानं त्याच्या इन्स्टा हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात त्यानं त्याच्या वडिलांना उपचारासाठी सोलापुरातील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलंय. अरबाज शेखच्या वडिलांवर सध्या सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, या रुग्णालयात कशा पद्धतीनं लूट होतेय, हे अरबाज शेख यानं आपल्या व्हिडीओत सांगितलंय. हॉस्पिटलमधील मेडिकलमधून औषधं घेणं बंधनकारक नसताना ही हॉस्पिटल एकाच मेडिकलमधून औषधं घेण्यासाठी जबरदस्ती करतं असल्याचं त्यानं या व्हिडीओत सांगितलंय. तसेच, तिच औषधं जर बाहेरुन घेतली असती, तर अर्ध्या किमतीत मिळाली असती, असंही अरबाजचं म्हणणं आहे.
औषध खरेदीवरुन FDA चा इशारा काय? (FDA Commissioner Tukaram Mundhe Order To Purchase Medicines)
रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणं कायद्यानं बंधनकारक नाही. औषधं कुठून खरेदी करायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा अधिकार आहे”, असा महत्त्वपूर्ण आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेला. तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेला.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या आदेशाबाबत माहिती देताना सांगितलेलं की, “बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे अशा तक्रारी येतात आणि माहिती मिळते की, हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट असेल, तर त्याला लागणारी औषधं त्याच हॉस्पिटलच्या फार्मसीमधून घेण्याची सक्ती केली जाते. पण, कायद्यानुसार कोणतीही संस्था किंवा रुग्णालय रुग्णांना अशी सक्ती करू शकत नाही. बाहेरून औषधं आणणं हा रुग्णाचा वैयक्तिक चॉईस आहे. तुम्ही कोणावरही सक्ती करू शकत नाही. औषधं कुठून खरेदी करायची, हा नागरिक आणि पेशंटचा मूलभूत अधिकार आहे…”
अरबाजच्या आरोपांवर रुग्णालयाचं म्हणणं काय?
‘सैराट’ फेम सल्या म्हणजे, अरबाज शेख यानं सोलापुरातील ज्या नोबल हॉस्पिटलवर आरोप केलेत, त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण केला. नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी अरबाज यानं केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केलाय. “अरबाज शेख याचे वडील अत्यंत सिरीयस स्थितीत हॉस्पिटलला आले होते. ते केवळ काही तास हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांना गरज असलेलीच औषध देण्यात आली होती. त्यासाठी आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्यायला कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, अरबाज यानं हे आरोप का केलेत? याची कल्पना आम्हाला नाही…”, असा दावा त्यांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना केलाय. मात्र, या संदर्भात स्वतः कॅमेरासमोर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज शेख काय म्हणालाय? (Arbaz Shaikh Appeal For Financial Help)
अरबाज शेख व्हिडीओमध्ये म्हणालाय की, “नमस्कार मी अरबाज शेख, मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवस झाले, पप्पांना ब्रेन हॅमरेज झालंय म्हणून सोलापूरला अॅडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं. नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही पेशंटला तिथे अॅडमिट केलं, तेव्हा सर्वात 10 हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले… त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की, या गोळ्या आपल्याला लागतील. मग मी त्यांना विचारलं की, मी हे बाहेरुन आणू शकतो? तर त्यांनी सांगितलं की, नाही तुम्हाला आमच्या मेडिकलमधूनच त्या गोळ्या, इंजेक्शन्स घ्यावा लागतील. मी त्यांच्या मेडिकलमधून औषधं घेतली, तर ती सर्व औषधं 40 हजारांहून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घ्यावीत, हा फोर्स होता. यापूर्वी जेव्हा पप्पांना अॅडमिट केलं, तेव्हा तिथे मला असा काहीच अनुभव आला नाही. त्या गोळ्या मी बाहेरुन आणल्या की, जवळपास अर्ध्या किमतीत मला त्या पडत होत्या. पण इथे एवढी लूट होतीय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचंय, म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय, त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की, मी कुठे ट्रिटमेंट केली पाहिजे? कशी ट्रिटमेंट केली पाहिजे मला आता काहीच कळत नाहीये, माझ्या वडिलांना मला वाचवायचंय काही करुन, मला मदत करा प्लीज…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :