Ramayan Jatayu: नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटातील जवळपास सर्व कलाकारांची निवड निश्चित झाली आहे. मात्र, अजूनही काही महत्त्वाच्या भूमिकांबाबत अधिकृत घोषणा झालेली नव्हती. अलीकडेच चित्रपटात भगवान शंकराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा करण्यात आला. आता ‘जटायू’च्या भूमिकेला आवाज देणाऱ्या कलाकाराचं नावही समोर आलं आहे. ‘रामायण’ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन जटायूला आवाज देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ताज्या अहवालानुसार हा दावा चुकीचा असल्याचं समोर आलं आहे.
कोण आहे ‘रामायण’मधील जटायू?
मिळालेल्या माहितीनुसार, जटायूला अमिताभ बच्चन नव्हे तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आवाज देणार आहेत. पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘वायरल कॉमिक बुक’ने हा दावा केला असून अनुपम खेर आपल्या दमदार आवाजातून जटायूचं पात्र जिवंत करणार आहेत. मात्र, याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रावणासोबत रंगणार जटायूचं महायुद्ध
‘रामायण’मध्ये यश साकारणाऱ्या रावण आणि जटायू यांच्यातील महायुद्ध हा चित्रपटातील सर्वात भव्य प्रसंगांपैकी एक असणार आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या प्रसंगाबद्दल बोलताना सांगितलं होतं, “रावण आणि जटायू यांच्यातील युद्ध किती भव्य आणि प्रभावी असू शकतं, याची प्रचिती प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतर येईल.”
‘रामायण’ कधी प्रदर्शित होणार?
नमित मल्होत्रा आणि यश यांच्या निर्मितीत साकारत असलेला ‘रामायण’ हा चित्रपट तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिला भाग यंदाच्या दिवाळीत, तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे.
‘रामायण’ची स्टारकास्ट
रणबीर कपूर -प्रभू श्रीराम
साई पल्लवी -सीता
यश – रावण
रवि दुबे -लक्ष्मण
रकुल प्रीत सिंह – शूर्पणखा
अरुण गोविल -दशरथ
लारा दत्ता – कैकेयी
सनी देओल – हनुमान
विवेक ओबेरॉय – विद्युतजीव
काजल अग्रवाल – मंदोदरी
शोभना – कैकसी
कुणाल कपूर – इंद्रदेव
शीबा चड्ढा -मंथरा
इंदिरा कृष्णन – कौसल्या
ट्रेलरला मिळतोय दमदार प्रतिसाद
24 जुलै रोजी ‘रामायण’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरची झलक पाहिलेल्या अनेक चित्रपट निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. रणबीर कपूर भगवान श्रीरामाच्या भूमिकेत प्रभावी दिसत असल्याचे सांगितले जात आहे. तर यशचा रावण आणि साई पल्लवीची सीता यांच्याही भूमिका विशेष लक्ष वेधून घेत आहेत.