![]()
ऋषींनी विनम्रतेने विचारले, “हे सूतजी! पुरुषोत्तम मासाच्या प्रभावामुळे राजा दृढधन्वा यांनी कशाप्रकारे राज्य, कुटुंब आणि शेवटी भगवंताचे परमस्थान कसे प्राप्त केले, ही कथा आम्हाला सविस्तर सांगा.”
तेव्हा सूतजी म्हणाले, “ही कथा स्वतः भगवान नारायणांनी देवर्षी नारदमुनींना सांगितली होती, तीच आता मी तुम्हा सर्वांना सांगत आहे.”
श्रीनारायण म्हणाले, “हे नारद! हैहय देशात चित्रधर्मा नावाचा एक पराक्रमी राजा राहत होता. तो स्वभवाने अत्यंत सदगुणी, प्रजेची काळजी करणारा जणु काही एक धर्मात्मा! त्यांचा पुत्र दृढधन्वा अत्यंत तेजस्वी, सत्यवादी, धर्मनिष्ठ आणि अनेक गुणांनी संपन्न होता. तो लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान तसेच गुरूंकडून वेद-शास्त्रांचे शिक्षण पूर्ण करून, त्यांच्या आज्ञेने पित्याकडे परतला. त्याला पाहून राजा चित्रधर्मा अतिशय आनंदित झाला.”
योग्य वेळ येताच राजा चित्रधर्मांनी वैराग्य स्वीकारले आणि राज्याची जबाबदारी दृढधन्वाकडे सोपवून स्वतः वनात तपश्चर्येसाठी गेले. तिथे भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करत त्यांनी कठोर तप केले आणि शेवटी त्यांना मोक्षप्राप्ती झाली.
पित्याच्या वियोगामुळे राजा दृढधन्वा अत्यंत दुःखी झाला, परंतु त्यांनी धर्मानुसार सर्व अंतिम संस्कार पूर्ण केले आणि त्यानंतर पुन्हा राज्यकारभारात लक्ष घातले. तो अत्यंत न्यायप्रिय, पराक्रमी आणि गुणवान राजा होता. त्यांची पत्नी गुणसुंदरी अत्यंत रूपवती आणि पतिव्रता होती. त्यांना चार पराक्रमी पुत्र आणि एक कन्या होती.
राजा दृढधन्वांच्या राज्यात सुख-समृद्धी नांदत होती. तो विद्वान, शूर आणि नीतिनिपुण तसेच शत्रूंचा पराभव करणारा पराक्रमी राजा होता, पण एके दिवशी त्यांच्या मनात एक गंभीर विचार निर्माण झाला.
एका रात्री त्याच्या मनात असा विचार आला की, “मी ना विशेष तप केले, ना दान दिले, ना यज्ञ केले, तरीही मला एव्हढे वैभव कसे प्राप्त झाले? यामागचे कारण काय असावे?”
या प्रश्नाने त्याचे मन अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी तो शिकारीसाठी जंगलात गेला. तिथे एका हरणाचा पाठलाग करताना ते घनदाट जंगलाच्या खूप आत पोहोचला. तो तहानेने व्याकुळ झाला होता, तेव्हढ्यात तिथे एक सरोवर दिसले, तो पाणी प्यायला आणि एका मोठ्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेऊ लागला.
त्याच वेळी तेथे एक अद्भुत पोपट (शुक पक्षी) आला. तो मानवी भाषेत एक गूढ श्लोक पुन्हा पुन्हा बोलू लागला, “हे मनुष्या! या क्षणभंगुर संसारातील सुखांमध्ये अडकून तू आत्मतत्त्वाचे चिंतन केले नाहीस, तर या संसाररूपी सागरातून पार कसा होशील?”
तो श्लोक ऐकून राजा दृढधन्वा आश्चर्यचकित आणि मोहित झाला. तो मनात विचार करू लागला, “हा कोणता दिव्य पुरुष आहे? हे स्वतः शुकदेवजी तर नाहीत ना, जे माझ्या उद्धारासाठी येथे आले आहेत?” इतक्यात त्याची सेना तिथे पोहोचली आणि तो शुक पक्षी अचानक अदृश्य झाला.
राजाने त्या गूढ वचनाला आपल्या मनात कायमचे स्थान दिले आणि तो आपल्या राज्यात परतला. आता त्याचे मन हळूहळू संसारातून विरक्त होऊ लागले. तो शांत राहू लागला, कोणासोबतही बोलत नव्हता जणू काही त्याने मौनव्रत धारण केले होते. त्याने अन्नाचाही त्याग केला. त्याचं मन जगापासून अलिप्त राहू लागलं.
राजाची ही अवस्था पाहून राणी गुणसुंदरी खूप काळजी वाटू लागली. तिने अगदीने नम्रपणे त्याला विचारले, “हे स्वामी! तुम्हाला कोणती चिंता सतावत आहे? तुम्ही मौन का आहात? तुमच्या मनातील गोष्ट मला सांगा.”
परंतु राजा त्या शुक पक्ष्याच्या त्या गूढ वचनांमध्ये इतका तल्लीन होता की, त्याने काहीच उत्तर दिले नाही. राणीला त्यांच्या दुःखाचे कारण समजू शकले नाही आणि ती जास्तच व्याकुळ राहू लागली.
अशा प्रकारे राजा दृढधन्वा गहन चिंतन आणि वैराग्यात मग्न राहिला, कारण आता त्याच्या जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार होती.