Prithviraj Chavan on Devendra Fadnavis: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवीन शिक्षण मंत्री कोण होणार, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या महत्त्वाच्या पदासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आजची तरुण पिढी (Gen Z) किंवा काँग्रेस पक्ष त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही. 2026 च्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक कोचिंग क्लासेस आणि पेपर तयार करणाऱ्यांची नावे समोर आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीही आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास व्यक्त करणे कठीण आहे. या संपूर्ण घोटाळ्यात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांचाही सहभाग होता का, हे केवळ निष्पक्ष एसआयटी (SIT) चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हेच योग्य असल्याचा दावा सातत्याने खासदार संजय राऊत यांच्याकडून केला जात आहे. अशा पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतंत्र भूमिका मांडल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत शिक्षण खात्यासाठी फडणवीस यांना विरोध केला आहे.
जनआंदोलनाचा दणका आणि तात्पुरती सोय
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, CJP आणि तरुण पिढीने (Gen Z) केलेल्या ऐतिहासिक आंदोलनामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपले पद गमवावे लागले आहे. हा आंदोलकांचा मोठा विजय मानला जात असून, पंतप्रधानांनी तूर्तास प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. जोशी यांच्याकडे आधीच तीन महत्त्वाची मंत्रालये असताना आता हे चौथे खाते जोडले गेले आहे. मात्र, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापर्यंत केलेली ही केवळ एक तात्पुरती सोय आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात क्षमता असलेला एकही नेता दिसत नाही
पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे की, कोलमडलेली शिक्षण व्यवस्था रुळावर आणणे, शिक्षणासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणे आणि आजच्या तरुण पिढीशी थेट संवाद साधू शकणाऱ्या एका राष्ट्रीय स्तरावरील पूर्णवेळ शिक्षण मंत्र्याची देशाला तातडीने गरज आहे. परंतु, सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अशी क्षमता असलेला एकही नेता दिसत नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिक्षण व्यवस्थेत आरएसएस (RSS) विचारसरणीच्या निष्ठावंतांची भरती केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याची टीकाही त्यांनी केली.
शिक्षणतज्ज्ञ की कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती?
सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर विश्वास उरला नसल्याने आता एखादा शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू किंवा सनदी अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली जाऊ शकते. इतकेच नव्हे तर राजकीय वर्तुळात नाव न घेता कॉर्पोरेट जगतातील नंदन निलेकणी यांच्यासारख्या नामांकित व्यक्तीचाही या पदासाठी विचार होऊ शकतो का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा