Sri Lanka XI vs India 3-Day Warm-up Match : श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी खेळल्या जात असलेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारतीय संघाची अत्यंत निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांना 36 षटकांपर्यंत एकही विकेट घेता आली नाही. श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत 166 धावांपर्यंत मजल मारली. भारताला मिळालेली एकमेव यशस्वी संधीही गोलंदाजाच्या खात्यात न जाता निशान मदुष्काच्या (66) धावांवर झालेल्या रनआऊटमुळे मिळाली.
पहिल्या सत्रात विकेटचे खातेच उघडले नाही
या सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांचा मारा पूर्णपणे निष्प्रभ ठरला. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 9 षटकांत 30 धावा दिल्या, मात्र त्याला एकही बळी मिळाला नाही. प्रसिद्ध कृष्णाने 5 षटकांत 27 धावा दिल्या, तर गुरनूर ब्रारने 4 षटकांत 25 धावा खर्च केल्या. फिरकी विभागाकडूनही अपेक्षित कामगिरी झाली नाही. रवींद्र जडेजाने 8.1 षटकांत 40 धावा दिल्या, तर कुलदीप यादवने 5 षटकांत 23 धावा दिल्या. मानव सुथारने 5 षटकांत केवळ 14 धावा देत काही प्रमाणात किफायतशीर गोलंदाजी केली, मात्र त्यालाही विकेट मिळवण्यात यश आले नाही. त्यामुळे 36 षटकांनंतरही भारतीय गोलंदाजांच्या विकेटच्या रकान्यात शून्यच कायम राहिला.
What a catch taken by KL Rahul 😭🤩 pic.twitter.com/il5oXcH3ix
— S~` (@duhh_itzsarthak) August 7, 2026
सलग दोन कॅच सोडले अन्…
भारतीय गोलंदाजांना साथ देण्यात क्षेत्ररक्षकही अपयशी ठरले. सामन्यात भारताने सलग दोन महत्त्वाचे झेल सोडले आणि श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठे जीवदान दिले. पहिली संधी कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर आली. 44 धावांवर फलंदाजी करत असलेल्या रवींदू रसंथाचा झेल कर्णधार केएल राहुलने उजव्या हाताने पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू हातातून सुटला. त्यानंतर काही वेळातच सिली पॉइंटवर उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलनेही रसंथाचा आणखी एक सोपा झेल टाकला. या दोन चुका भारतीय क्षेत्ररक्षणातील कमकुवतपणा स्पष्ट करणाऱ्या ठरल्या.
जीवदानाचा श्रीलंकेच्या फलंदाजांनी घेतला पुरेपूर फायदा
भारताने दिलेल्या जीवदानाचा श्रीलंकेच्या फलंदाजांनी पूर्ण फायदा घेतला. रवींदू रसंथा संयमी फलंदाजी करत 106 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला, तर त्याला पसिंदू सूर्यबंदरा याने चांगली साथ दिली. सूर्यबंदराने 46 चेंडूत 33 धावांची खेळी करत धावगती कायम ठेवली. श्रीलंकेने सुमारे 4.59 च्या धावगतीने सहज धावा जमवल्या आणि भारतीय गोलंदाजांवर कोणताही दबाव येऊ दिला नाही. विकेट न मिळाल्याने भारतीय गोलंदाजांची निराशा आणखी वाढली.
कसोटी मालिकेपूर्वी टीम मॅनेजमेंटची वाढली डोकेदुखी
सराव सामन्यातील ही कामगिरी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. गोलंदाजांना विकेट मिळत नसणे, क्षेत्ररक्षकांकडून सोपे झेल सुटणे आणि श्रीलंकेच्या फलंदाजांनी सहज धावा करणे या तिन्ही बाबी कसोटी मालिकेपूर्वी गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखालील संघासाठी चिंतेचा विषय ठरल्या आहेत. पहिल्याच सराव सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्ही विभागांतील उणिवा समोर आल्या आहेत. आता या चुका सुधारून कसोटी मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.
हे ही वाचा –