सिंधुदुर्ग : आयुष्यभर ज्यांनी राणे कुटुंबाचा तिरस्कार केला, त्यांची सातत्याने बदनामी केली, ते आज स्वतःच्याच कर्माने ‘हिट विकेट’ झाले आहेत, अशा कडक शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नियती कोणालाही माफ करत नाही, म्हणूनच सांगतो की राणेंशी नेहमी चांगले राहा, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला आहे.
कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना आमदार निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर ओढवलेल्या कायदेशीर संकटाचा खरपूस समाचार घेतला.
Nilesh Rane Speech : नियतीनेच धडा शिकवला
माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या सूनबाई गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबाविरोधात ठाण्यात कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत (Anti Black Magic Act) गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. याच संपूर्ण प्रकरणाचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
राणे म्हणाले, “गेल्या 20-20 वर्षांपासून काही लोकांनी केवळ राणेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा, त्यांची समाजात बदनामी करण्याचा आणि त्यांच्या मागे नको त्या यंत्रणा लावण्याचा उद्योग केला. एखाद्याबद्दल किती वाईट करायचे, याला काही मर्यादा असते की नाही? पण आज बघा, आम्हाला त्यांच्याविरुद्ध काहीही करावे लागले नाही, तर नियतीनेच (Destiny) त्यांना असा काही धडा शिकवला आहे की ते स्वतःच आपल्या घरातून ‘हिट विकेट’ झाले आहेत.”
Rane Family Sindhudurg : ‘राणे असले नको ते धंदे करत नाहीत’
आपल्या भाषणात पुढे बोलताना निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या राजकारणाचा दाखला दिला. राणे कुटुंब कधीही असले नको ते धंदे करत नाहीत आणि आमच्याकडे असल्या गोष्टींसाठी वेळही नाही, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले. शेवटी कार्यकर्त्यांना आणि राजकीय विरोधकांना सूचक इशारा देताना ते म्हणाले, नियती कोणालाही माफ करत नाही. म्हणूनच तुम्हाला सांगतोय, राणेंशी चांगले राहा.
ही बातमी वाचा:
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से