Mumbai Rain Updates: दक्षिण मुंबईत देखील सकाळपासून संततधार पाऊस (Mumbai Rain) सुरू आहे. पुढील 2-3 दिवस मुंबईत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोबतच, जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 तास मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसाठी पुढील दोन ते तीन तास महत्वाचे असणार आहे. तसेच पावसाचा जोर बघता आज मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा प्रादेशिक हवामान केंद्राकडून होताना दिसू शकेल. पु (Mumbai Rain Updates)
मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला- (Mumbai Rain Updates)
सकाळपासूनच मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबईच्या बहुतांश भागात पाऊस झाल्याची माहिती आहे. सायन परिसरात देखील पावसाची संततधार कायम असून ऐन सकाळच्यावेळी भर रस्त्यात बेस्ट बस बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबईत आज देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 ते 48 तासांसाठी मुंबईत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, तसेच राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती असून 24 ते 27 जून दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागातील काही प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Rain)
रायगडमध्येही पावसाची रिमझिम- (Raigad Rain)
रायगडमध्येही पावसाची रिमझिम सुरु आहे. रायगडमध्ये सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागातील माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रायगड जिल्ह्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दापोली तालुक्यात अखेर पावसाची दमदार हजेरी- (Dapoli Rain Updates)
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. भात रोपवाटिका करपण्याच्या मार्गावर पोहोचल्या होत्या, तर अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत होता. मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. भात शेतीला नवसंजीवनी मिळाली असून विहिरी, ओढे आणि जलस्रोतांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्गात कालपासून पाऊस सक्रिय- (Sindhudurg Rain Updates)
सिंधुदुर्गात कालपासून पाऊस सक्रिय झाला असून जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 80.87 मी.मी. पाऊस कोसळला आहे. सर्वाधिक पाऊस देवगड तालुक्यात 126 मी.मी. पाऊस झाला. गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे. पुढील पाच दिवस जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात तर ढगफुटीसदृश पाऊस- (Pune Junnar Rain)
मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुण्यात तुफानी पाऊस बरसला. जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाल्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. त्यामुळे स्थानिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातमी:
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story