Balasaheb Thackeray and Kiran Pawaskar Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेल्या ठाकरे गटाच्या सहा फुटीर खासदारांनी सोमवारी मुंबईतील कार्यक्रमात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश आष्टीकर पाटील या सहा खासदारांनी शिंदे सेनेचा भगवा खांद्यावर घेतला. शिंदे गटाचे नेते किरण पावसकर (Kiran Pawaskar) हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. यावेळी पावसकर हे ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) कसा फरक आहे, ही शिवसेना कशी सामान्य कार्यकर्त्यांना जपणारी आहे, हे सांगत होते. त्यावेळी पावसकर यांच्या तोंडातून बाहेर पडलेले एक वाक्य वादाचा विषय ठरत आहे. किरण पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या, ‘उद्धव आणि आदित्यला सांभाळा’ या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. अशाप्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच टीका करणे योग्य आहे का, असा सवालही ठाकरे गटाकडून विचारला जात आहे. (Maharashtra Politics News)
Kiran Pawaskar: किरण पावसकर नेमकं काय म्हणाले?
एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलतं, आता दुसऱ्याला सांभाळा. त्यांना सांभाळलं की, मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणाघर आहे का? इकडे सांगितलं जातं की, शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोकं माझ्यासोबत आलेत, डॉ. श्रीकांत शिंदे त्यांची जबाबदारी ही तुमची आहे, तुम्ही माझ्यासोबत त्यांना सांभाळायचं आहे. हा दोन्ही पक्षांमधला फरक आहे.
Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांनी 2012 साली दसरा मेळाव्यात काय आवाहन केलं होतं?
2012 साली प्रकृती ठीक नसल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित न राहता एका व्हिडीओच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते. यावेळी ठाकरे घराण्याच्या पुढच्या पिढीला मी तुमच्या हाती सोपवत आहे, त्यांना सांभाळा, असे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. आज मी साफ थकलो आहे, शारीरिकदृष्ट्या कोसळलो आहे. बोलताना धाप लागते. नीट चालता येत नाही. मी मैदान गाजवणारा माणूस होतो, किती दौरे, किती भाषणे केली, आता सर्व अवयव बिघडले आहेत. डॉक्टरांनी माझ्या शरीराची प्रयोगशाळा केली आहे. मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरुन जा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडे नाही. उद्धव आणि आदित्यला मी तुमच्यावर लादलेले नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या, असा संदेश बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला होता.
आणखी वाचा
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story