सूर्यकुमार यादव याने रोहित शर्मा याचा वारसा यशस्वीरित्या कायम राखत आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला टी 20i क्रिकेटमध्ये अजिंक्य ठेवलं. रोहितने 2024 साली 29 जून रोजी भारताला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर सूर्यकुमारला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. सूर्याने भारताला 2024 पासून 2026 च्या टी 20i वर्ल्ड कपपर्यंत अजिंक्य ठेवलं. मात्र सूर्याला वैयक्तिक कारणामुळे कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. सूर्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर याला नेतृत्वाची धुरा देण्यात आली. मात्र श्रेयस पहिल्याच टी 20i मालिकेत कर्णधार म्हणून सूर्याचा वारसा कायम ठेवण्यात ठार अपयशी ठरला.
आयर्लंडने रविवारी 28 जून रोजी टीम इंडियाला दुसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 1 धावेने पराभूत केलं. यासह तुलनेत दुबळ्या असलेल्या आयर्लंडने मायदेशात टीम इंडियाला 2 सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्वीप केलं. आयर्लंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टीम इंडिया विरुद्ध टी 20i मालिका जिंकली.
आयर्लंडच्या या ऐतिहासिक मालिका विजयानंतर विजयी जल्लोष सुरु आहे. मात्र त्यानंतर काही तासांनी मोठी अपडेट समोर आली आहे. आयर्लंडचे मुख्य प्रशिक्षक हेन्रिक मलान यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आयर्लंड क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
हेन्रिक मलान यांच्या राजीनाम्याचं कारण काय?
हेन्रिक मलान हेड कोच म्हणून आयर्लंडला टीम इंडिया विरुद्ध टी 20i मालिका जिंकून देण्यात यशस्वी ठरले. मात्र त्यानंतरही मलान यांनी पदाचा राजीनामा का दिला? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या राजीनाम्याचं कारण आपण जाणून घेऊयात. नव्या प्रशिक्षकाला आगामी मालिकांसाठी पूरेसा वेळ मिळावा म्हणून राजीनामा देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
मलान यांची कारकीर्द
दरम्यान मलान यांनी 2022 साली आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वात 3 वेळा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरली. आयर्लंडने या दरम्यान 3 कसोटी सामने जिंकले.