लग्नात हुंडा देऊनही हाव संपेना, पैशांसाठी पत्नीचा अमानुष छळ, बुलढाण्यात तरुणीने संपवलं जीवन | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

News18
News18

राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पतीसह सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं जीवन संपवलं आहे. शेअर मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी विवाहितेकडे माहेरून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. सासरच्या छळाला कंटाळून अखेर एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैष्णवी गणेश मेरत असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी आणि गणेश मेरत यांचा विवाह झाल्यानंतर, लग्नात हुंडा दिला गेला होता. मात्र, लग्न झाल्यावरही सासरच्या मंडळींकडून वैष्णवीला हुंड्यासाठी सातत्याने त्रास दिला जात होता. दरम्यान, पती गणेश मेरत याला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचं नुकसान झालं. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने वैष्णवीकडे माहेरून १० लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला आणि तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल

सासरच्यांकडून दररोज होणाऱ्या या अमानुष त्रासाला कंटाळून अखेर वैष्णवीने घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पती गणेश मेरत याला अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

या घटनेची अधिक माहिती सांगताना मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार म्हणाले की “या प्रकरणी वैष्णवीचे सासू-सासरे आणि पतीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी पती गणेश मेरतला पोलिसांनी अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *