Health Tips : फॅटी लिव्हर हा आज भारतीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आरोग्याचा गंभीर प्रश्न ठरत आहे. अनेकांना आपण या आजाराने ग्रस्त असल्याची कल्पनाही नसते. पूर्वी केवळ मद्यपानामुळे होणारा हा आजार अशी ओळख असलेला फॅटी लिव्हर आज प्रामुख्याने लठ्ठपणा आणि चयापचयातील (मेटाबॉलिक) बिघाडामुळे वाढत असून, भारतीय पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मेटाहीलच्या बॅरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये करण्यात आलेल्या एका भारतीय अभ्यासानुसार देशातील सुमारे 38.6 टक्के प्रौढ नागरिकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा आजार आहे. या आजाराला आता मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिअॅटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) असे संबोधले जाते. लठ्ठपणा, मधुमेह किंवा या दोन्ही समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण 52 टक्क्यांहून अधिक आहे.
दक्षिण भारतातील गंभीर लठ्ठपणामुळे बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांवरील अभ्यासात जवळपास 66 टक्के रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या आढळून आली आहे. चेन्नईतील एका आरोग्य संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत फॅटी लिव्हरचा धोका 1.59 पट अधिक आहे.
यकृत हे केवळ पचनसंस्थेचा भाग नसून शरीरातील चयापचय प्रक्रियेचे महत्त्वाचे केंद्र आहे. विशेषतः पोटाभोवती साचणारी अतिरिक्त चरबी शरीराच्या क्षमतेपेक्षा वाढू लागल्यास तिचा साठा यकृतात होऊ लागतो. कालांतराने ही चरबी यकृतामध्ये दाह निर्माण करते आणि मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टिअॅटोहेपेटायटिस (MASH) या गंभीर अवस्थेकडे वाटचाल होते. पुढे यामुळे लिव्हर फायब्रोसिस, सिऱ्होसिस आणि काही प्रकरणांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
फॅटी लिव्हरची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या आजाराची बहुतेक वेळा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे यकृताचे नुकसान झाल्यानंतरच याची माहिती मिळते. नियमित लिव्हर फंक्शन चाचण्यांमध्येही अनेकदा कोणतीही असामान्यता दिसून येत नाही. अल्ट्रासाऊंड किंवा फायब्रोस्कॅनसारख्या तपासण्यांमधूनच यकृतात चरबी साचल्याचे निदान होते. थकवा, पोटातील अस्वस्थता किंवा इतर तपासण्यांदरम्यान या आजाराविषयी निदान होऊ शकते आणि तोपर्यंत तो अनेकदा प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो.
फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करावे?
वजन नियंत्रणात ठेवणे :
शरीराच्या वजनात 7 ते 10 टक्के घट झाल्यास यकृतातील चरबी आणि दाह लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा : प्रक्रिया केलेले पदार्थ, शर्करायुक्त पेय आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स यकृतासाठी हानिकारक ठरतात.
नियमित व्यायाम करा :
आठवड्यात किमान 150 मिनिटे एरोबिक व्यायाम केल्याने वजन कमी नाही झाले तरी यकृतातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंगचा देखील फायदा होतो.
वेळीच तपासणी करा :
30 वर्षांवरील, पोटाभोवती चरबी असलेल्या, मधुमेह किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढलेल्या पुरुषांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लिव्हर अल्ट्रासाऊंड आणि फायब्रोस्कॅन करून घ्यावा.
औषधं आणि बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया :
गंभीर लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये GLP-1 आधारित औषधे किंवा बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी करण्याबरोबरच फॅटी लिव्हरची तीव्रता कमी करण्यास आणि आणि तो बरा होण्यास मदत होते.
वेळेवर तपासणी हाच सर्वोत्तम उपाय
फॅटी लिव्हरची लगेचच लक्षण दिसून येत नाहीत आणि त्यामुळेच हा आजार वेगाने वाढत जातो. त्यामुळे वजन आणि मेटाबॉलिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे आणि नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. अपर्णा गोविल भास्कर,येथील लॅप्रोस्कोपिक व बॅरियाट्रिक सर्जन, मेटाहील क्लिनिक, मुंबई
Eye Redness: पावसाळ्यात डोळे लाल होतायत? चुकुनही दुर्लक्ष करू नका; हे असू शकतं गंभीर आजाराचंही लक्षण !
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण