Buldhana: मित्राच्या मृत्यूचा थरार डोळ्यासमोर पाहिला, पोहण्यासाठी डोहात उरतरलेले 3 तरुण बुडाले | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

बुलढाण्यात डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू, दोघांना वाचवले. पर्यटनाचा आनंद घेताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना. थरारक व्हिडिओ समोर.

News18
News18

पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी डोहात उतरणे तीन तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. खामगाव तालुक्यातील वारी हनुमान येथील डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही डोहात बुडू लागले. या घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडिओ ‘न्यूज18 मराठी’च्या हाती लागला आहे. या दुर्दैवी घटनेत योगेश वानखडे या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे.

नेमकी कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, खुटपुरी गावातील प्रशांत बोचरे, विनोद वानखडे आणि योगेश वानखडे हे तीन तरुण वारी हनुमान परिसरातील डोहात पोहण्यासाठी गेले होते. पर्यटनाचा आनंद घेत असताना तिघेही पाण्यात उतरले. मात्र, डोहातील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक बुडू लागले आणि जिवाच्या आकांताने मदत मागू लागले. तलावाच्या काठावर असलेल्या स्थानिक नागरिकांच्या ही गोष्ट तात्काळ लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता डोहात उड्या मारून तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

स्थानिकांचे प्रसंगावधान; CPR देऊन एकाला दिले जीवदान

स्थानिकांनी अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून दोघांना पाण्याबाहेर काढले. यातील एका तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि त्याचा श्वास थांबला होता. मात्र, उपस्थितांनी अजिबात न घाबरता त्याला तातडीने CPR देण्यास सुरुवात केली. स्थानिकांच्या या धाडसामुळे आणि वेळेवर दिलेल्या CPR मुळे त्या तरुणाचा श्वास परत आला आणि त्याला नवे जीवदान मिळाले. मात्र, दुर्दैवाने योगेश वानखडे या तिसऱ्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्या या अपघाती निधनाने खुटपुरी गावावर शोककळा पसरली आहे.

धक्कादायक व्हिडिओ आला समोर

हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता नदी, तलाव किंवा डोहात उतरणे कसे जीवावर बेतू शकते, हेच या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आले आहे. अनपेक्षित ठिकाणी पोहण्यासाठी उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *