Art of Living’s 45th Anniversary: जीवनाला उत्सव बनवणारा अवलिया!



Art of Living’s 45th Anniversary: प्रत्येकाला जीवनात आनंद हवा असतो पण तो मिळवायचा आणि टिकवायचा कसा हे मात्र समजत नाही. त्यासाठी कोणी मार्गदर्शक हवा असतो. माझ्या सुदैवाने तो मला 25 वर्षांपूर्वी लाभला आणि माझे जीवनच बदलून गेले. मी ‘जीवन जगण्याची कला’ अर्थात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकले. 2001 साली मी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा पहिला कोर्स केला. तो सहा दिवसांचा होता, एकूण 20 तास. पण तो केल्यावर मला जाणवले की वयाच्या 36 व्या वर्षी माझा पुनर्जन्म झाला आहे. 

चार वर्षांचा आजार बरा झाला

त्या कोर्सच्या काळात माझी चार वर्षे साथ देणारी व्याधी अगदी सहज अदृश्य झालीच, पण त्याचबरोबर जीवनाची एक अवर्णनीय अनुभूति आली. आजवर कधीही न अनुभवलेला एक वेगळ्याच उच्च पातळीचा आनंद प्राप्त झाला. ‘सुदर्शन क्रिया’ केल्यावर स्वतःचे आणि एकूणच या जीवनाचे एक अभूतपूर्व दर्शन झाले. आणि त्यानंतर नियमित साधना आणि गुरुवचनांचा अभ्यास यामुळे सगळे आयुष्यच एका अद्भुत चमत्कारासारखे भासू लागले.

45-70 उत्सव एक अद्वितीय पर्वणी

1981 मध्ये श्री श्री रवि शंकर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ची स्थापना केली तेव्हा ते 25 वर्षांचे होते. आता 2026 मध्ये 13 मे रोजी गुरूदेव 70 वर्षांचे होतील आणि संस्था 45 वर्षांची. या केवळ 45 वर्षांत गुरुदेवांच्या ध्येयासक्तीमुळे, दैवी शक्तीमुळे आणि अखंड परिश्रमांमुळे ही संस्था 182 देशांमध्ये पसरलेली जगातील सर्वात मोठी सेवाभावी चळवळ आहे.

कोट्यावधी लोकांनी गुरुदेवांच्या अतिशय व्यावहारिक आणि परिणामकारक ज्ञानाला आत्मसात करून आपले जीवन सहज, आनंदी आणि अद्भुत बनवले आहे. ‘सुदर्शन क्रिया’ ही एक अतिशय सहज आणि सुलभ श्वसन प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून स्वतःचे आणि त्याचबरोबर स्व‍कीयांचे जीवन आनंदोत्सवी बनवले आहे.

विश्व विकास हेच ध्येय

पण व्यक्ती विकास आणि व्यक्तीच्या अपार क्षमतांची जाणीव करून देणे एवढेच गुरुदेवांचे लक्ष्य नाही. व्यक्ती विकासातून समाज विकास आणि समाज विकासातून विश्व विकास हे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला लाभलेल्या दैवी ज्ञानाचा अविरत प्रसार करण्यासाठी ही संस्था जोपासली आणि वाढवली आहे. त्यांचे ज्ञान आणि सेवाकार्य सर्वदूर पोचावे यासाठी जगभरात चाळीस हजाराहून अधिक प्रशिक्षक आणि लाखो स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे. समाजाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असे हजारो प्रकल्प जगभर सुरु केले आहेत.
    
शिक्षण, पर्यावरण संवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, नैसर्गिक शेती, कारागृहातील कैद्यांचे मानसिक संगोपन, युद्धावरून परतलेल्या सैनिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळणे, इत्यादी अनेक क्षेत्रांमधील आपल्या सर्वांगीण कार्याद्वारे संस्थेने समाजावर टाकलेल्या प्रभावाची आकडेवारी आणि यादी किती करावी तेव्हढी अपुरीच राहणार आहे. तरी ही आकडेवारी  ‘शाश्वत समाज विकासासाठी ‘व्यक्तीचे सक्षमीकरण’ हाच मूलाधार असतो’, या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. गुरूदेव म्हणतात, “आनंदी माणसेच आनंदी समाजांची निर्मिती करतात.”

गुरुदेव श्री श्री रवि शंकर पुढे म्हणतात: “जेव्हा सर्व काही सुरळीत चालू असते, तेव्हा स्मितहास्य करणे ही काही विशेष गोष्ट नाही; परंतु संघर्ष आणि अराजकतेच्या परिस्थितीतही तुम्ही सहजतेनं मंद स्मित करू शकाल, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने ‘जगण्याची कला’ (The Art of Living) शिकले आहात.”
सध्याचा काळ वाढता जागतिक तणाव, वैयक्तिक आणि सामाजिक संघर्ष आणि तीव्र अशांततेचा आहे. अशा वेळी शांततेचा संदेश पूर्वीपेक्षाही अधिक स्पष्टपणे ऐकला जाणे नितांत गरजेचे आहे. म्हणूनच, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या वर्षीच्या आनंद उत्सवांना एक नवा अर्थ प्राप्त झाला आहे. 

शांतता आणि सामायिक मानवतेचा संदेश

हे उत्सव आशा, शांतता आणि सामायिक मानवतेचा संदेश घेऊन आले आहेत. स्वतःशीच संघर्ष करणाऱ्या मानवतेला खऱ्या अर्थाने सामर्थ्य प्रदान करण्याची क्षमता केवळ अध्यात्मामध्येच आहे. लोकांमध्ये पुन्हा सुबुद्धी आणि आपलेपणाची भावना अध्यात्मच जागृत करू शकते. केवळ स्वतःच्या हिताचा विचार करण्याऐवजी इतरांची सेवा करण्यास तत्पर असणारे सर्वसमावेशी हृदय केवळ अध्यात्मानेच शक्य आहे. आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या ४५ व्या वर्षांच्या उत्सवाचा हाच नेमका गाभा आहे.

गेल्या 45  वर्षांत ‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’ने पर्यावरण संवर्धन, आपत्ती निवारण, आघातांमुळे येणाऱ्या तणावापासून मुक्ती, सर्व दूर सर्वांगीण शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील असंख्य समाजसेवा उपक्रमांद्वारे जगभरातील कोट्यावधी लोकांची सेवा केली आहे. इतकेच नव्हे तर प्रभावी आणि विज्ञाननिष्ठ श्वसनतंत्रे व ध्यानसाधनेच्या माध्यमातून 80 कोटींहून अधिक लोकांना त्यांच्या अंतर्मनातील आनंद आणि शांतीशी जोडण्यास मदत केली आहे. परिणामी, आज हे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानकारक आणि निरोगी आयुष्य जगत आहेत.

भारतामध्ये अतिशय दुर्गम ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये संस्थेतर्फे 1327 मोफत शाळा चालवल्या जातात. या शिक्षणाद्वारे १.२० लाखांहून अधिक मुलांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोचतो. देशातील 75 हून अधिक नद्या आणि जलस्रोतांच्या संस्थेच्या वतीने केलेल्या पुनरुज्जीवनामुळे जवळपास साडेतीन कोटी लोकांना लाभ झाला आहे. ‘प्रिझन स्मार्ट’ उपक्रमाद्वारे पुनर्वसन झालेले हजारो कैदी असोत, किंवा नैसर्गिक शेती पद्धतींद्वारे प्रशिक्षित केलेले लाखो शेतकरी असोत, अशा सामान्य लोकांनीच या संस्थेचे कार्य प्रामुख्याने पुढे नेले आहे. हे यामुळेच शक्य झाले कारण त्यांनी काहीतरी असाधारण करण्याची तयारी दाखवली.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रोजेक्ट्स’ विभाग सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणसंबंधी आव्हानांवर सर्वांगीण उपाय देऊ करतो. आमचे कार्य स्थानिक समुदायांशी असलेल्या भक्कम भागीदारीमध्ये रुजलेले आहे. त्याचबरोबर विविध कॉर्पोरेशन्स, शासकीय कार्यालये, अशासकीय संस्था (NGOs), विकास संस्था आणि सामाजिक प्रतिष्ठाने यांच्या सहयोगातून ते अधिक बळकट झाले आहे. आमचा दृष्टीकोन अखिल भारतात विस्तारलेला आहे त्यायोगे आम्ही सहयोगात्मक दृष्टिकोन, क्षमता-वृद्धीचे प्रभावी कार्यक्रम आणि विस्तारक्षम कार्यप्रणालींच्या माध्यमातून समाजावर सशक्त आही सकारात्मक प्रभाव पडणारे उपक्रम राबवतो.

पण हे झाले समाजासाठी राबवलेले प्रकल्प. याशिवाय आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध कोर्स करून आपले जीवन अतिशय समृद्ध, सशक्त आणि आनंदी केलेल्या करोडो लोकांनी या अद्भुत ज्ञानाच्या आधारे आपल्या सभोवतालचे वातावरण अधिक सकारात्मक व्हावे यासाठी सतत कार्य चालू ठेवले आहे. सध्याच्या सामाजिक वातावरणात अशा सकारात्मकतेची नितांत आवश्यकता आहे. गुरूदेव म्हणतात, “या ज्ञानाद्वारे तुम्हाला जीवन अधिक आनंदी झाल्याचे जाणवले असेल तर मग या ज्ञानज्योतीने आपल्या भोवतालच्या किमान दहा दिव्यांना तरी प्रज्वलित करा. असे करत राहाल तर हा ज्ञानप्रकाश हळू हळू सर्वदूर पसरेल आणि दुःखाच्या अंधाराचा संपूर्ण विनाश होईल.”

जगभरात 182 देशांमध्ये प्रसार 

स्वतः गुरूदेव या वयातही जगभर भ्रमण करून हा आनंदाचा ज्ञानसंदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवू पाहतात. संस्थेतर्फे चालवलेल्या सेवाप्रकल्पांचा आढावा घेतात आणि त्याला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देतात. जगभरात १८२ देशांमध्ये सर्व पातळींवरील लोकांमध्ये त्यांच्या प्रेमाची छाया पाहता येते. मला तरी सध्याच्या जगात त्यांच्याएवढा सर्वप्रिय आणखी कुणी दिसत नाही.

गुरुदेवांना “शांतीचा देवदूत” असे संबोधले जाते. कोलम्बियापासुन ते श्रीलंका, ईशान्य भारत, उत्तर भारत आणि काश्मीर आदि अनेक भागातील गृहयुद्धे थांबवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सर्वाना माहित आहेत. युनो पासून ते दावोस पर्यंत; जगातल्या अनेक शिक्षण संस्थांपासून ते युद्धग्रस्त प्रदेशातील पीडीतांपर्यंत सर्व ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रण असते आणि ते तिथे जाऊन देतात. त्याचबरोबर एका गावातल्या शेतकऱ्यापासून ते एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वांच्या दुःखांचे आणि अडचणींचे निवारणही करतात. 

रोज हजारो लोक त्यांचे दर्शन घेऊन तृप्त आणि आनंदी कसे होतात हे अनुभवायचे असेल तर त्यांच्या दैनंदिन सत्संगामध्ये जाऊन बसावे. आधुनिक सोशल मिडीयाच्या माध्यमातूनदेखील गुरूदेव sw लोकांना नेमके योग्य मार्गदर्शन करून त्यांचे दुःख निवारण कसे काय करतात, हा अभ्यासाचा विषय आहे.

जीवन समृद्ध होणार अनुभव 

आर्ट ऑफ लिव्हिंगध्ये आल्यापासून आधी गुरूदेवांचा शिष्य आणि मग त्यांच्या ज्ञानाला लोकांपर्यंत पोचवण्याचे त्यांचे एक साधन (हॅपीनेस प्रोग्राम प्रशिक्षक) या नात्यांनी माझे जीवन समृद्ध केले आहे. त्यांच्या ज्ञानाच्या मदतीने जीवनातील सर्व अडचणी सोप्या झाल्यात, सर्व दुःखे सुसह्य झालीत आणि सर्व संकटे आपसूकच विरून गेली आहेत. आनंदाची उच्च पातळी अनुभवता आली आहे. रोजचे अद्भुत चमत्कार आता अनुभवात येत नाहीत, कारण गुरुदेवांच्या आशीर्वादाने हे पूर्ण जीवनच एक चमत्कार बनून राहिले आहे.

मी गुरूदेवांची ऋणी आहे, असे मला अजिबात वाटत नाही. कारण मी आणि गुरूदेव वेगळे कुठे आहोत?

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *