मुंबई : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आज दिवसभर मुंबईसह उपनगरा पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. या पावसासह काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं पडल्याच्याही घटना घडल्या असून चेंबूर परिसरात मन हेलावणारी दुर्घटना घडली. येथील वार्ड नं 11 मधील रस्त्यावरुन जाणाऱ्या एका स्कुल बसवर (Bus accident) मोठं झाड कोसल्याने भीषण अपघात झाला. या बसमधील 10 लहान मुले झाडाखाली अडकली होती, यातील सर्वांना बाहेर काढले. मात्र, एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर जखमी असलेल्या 4 लहान मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती आहे. मात्र, विहान श्रीवास्तव या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विहान हा गौरव श्रीवास्तव यांचा मुलगा असून गौरव हे भाडे तत्त्वावर चेंबूरच्या कुकरेजा रेसिडेन्सीमध्ये राहतात, ते सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) आहेत. विहानचे आई वडील दोघेही कामाला जातात, त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे, श्रीवास्तव कुटुंबीयांवर या दुर्घनटेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आता, दिल्ली आणि ग्वाल्हेरवरुन विहानचे आजी आजोबा मुंबईला येत आहेत. नातेवाईक मुंबईत आल्यानंतरच उद्या दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती आहे. दरम्यान, येथील आमदार तुकाराम काते यांच्या बाजूलाच हे श्रीवास्तव कुटुंब राहत आहे, विशेष म्हणजे त्यांच्या नातवासोबत विहान रोज खेळायचा, त्यांच्या घरी देखील यायचा, अशी देखील माहिती आहे.
चेंबूरमधील शाळा बस दुर्घटना प्रकरणात पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या प्रकरणी ADR दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू झाला आहे. झाड कोसळण्यामागील कारणांसह सर्व बाबींची चौकशी केली जाईल. दुर्घटनेनंतर परिसरातील धोकादायक झाडांचीही तपासणी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
परिसरातील झाडांचा ड्राईव्ह
दरम्यान, स्कुलबसमधील जखमी, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा खर्च हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या दुर्घटनेमध्ये ज्याचा मृत्यू झाला, त्या कुटुंबीयाला मदत केली जाणार आहे. मात्र, रस्त्या लगत असलेल्या झाडांमुळे अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे, त्याचा एक ड्राईव्ह घेतला पाहिजे, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
हेही वाचा
मुंबईत पावसाचा जोर वाढला, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद, तर भिवंडीसह पालघरमध्येही मुसळधार पाऊस
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?