क्लिनिकल आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट तसेच गट हेल्थ स्पेशालिस्ट आवंती देशपांडे यांनी सांगितले की, आपल्या आजी-आजोबांच्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या मिलेट्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. आजच्या आधुनिक जीवनशैलीत ही धान्ये मागे पडली असली, तरी त्यांचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता पुन्हा एकदा त्यांचे महत्त्व वाढत आहे.
त्यांच्या मते, ज्वारी ही केवळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीच उपयुक्त नाही, तर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. ज्वारीतील भरपूर फायबरमुळे गट हेल्थ सुधारण्यास मदत होते. पचनसंस्था चांगली राहिल्यास शरीरातील दाह (इन्फ्लेमेशन) कमी होण्यास मदत होते आणि त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो.
आवंती देशपांडे यांनी सांगितले की, हार्मोनल असंतुलन, पीसीओएस (PCOS), हायपोथायरॉईडीझम यांसारख्या समस्यांमध्येही ज्वारी आणि इतर मिलेट्सचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो. त्यांच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्णांनी मिलेट्सचा नियमित वापर सुरू केल्यानंतर आरोग्यात सकारात्मक बदल अनुभवले आहेत.
भारताच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात मिलेट्सबाबत जागरूकता वाढली. त्यामुळे ज्वारीसारख्या पारंपरिक धान्यांना जागतिक स्तरावरही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, ज्वारीचा वापर केवळ भाकरीपुरता मर्यादित न ठेवता थालीपीठ, धिरडे, उपमा, लाडू, डोसा, खिचडी, तसेच इतर अनेक पदार्थांमध्ये करता येतो. विशेषतः लहान मुलांना सुरुवातीपासूनच विविध स्वरूपात ज्वारीची ओळख करून दिल्यास त्यांना तिची चव आवडू लागते आणि त्याचा आरोग्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतो.
संतुलित आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीसोबत डाळी, कडधान्ये, हिरव्या भाज्या, सॅलड आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पोषकतत्त्वांचा समतोल पुरवठा होतो.
गहू आणि तांदळाचे वाढलेले प्रमाण कमी करून त्याऐवजी ज्वारीसह इतर मिलेट्सचा समावेश केल्यास पचन सुधारण्यास, रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यास, वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीरातील दाह कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज वेगळी असल्याने आहारात मोठे बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पारंपरिक धान्यांचा स्वीकार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत असून, वर्षभर ज्वारीचा विविध प्रकारे आहारात समावेश करून तिच्या पोषणमूल्यांचा लाभ घेता येऊ शकतो.