NCP Crisis: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर फुटीचे संकेत देणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात सध्या दोन मतप्रवाह आहेत. पक्षातील एका गटाकडून सध्याची पक्षाची परिस्थिती पाहता काँग्रेसमध्ये (Congress) विलीन व्हावे, अशी भूमिका घेतली जात आहे. तर पक्षातील दुसऱ्या गटाची एनडीएसोबत (NDA) जाण्याची भूमिका आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात या दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याचे समजते. (Maharashtra Politics news)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांचा संख्येची ताकद पाहता एनडीए आघाडीत घटक पक्ष म्हणून संधी मिळत असल्यास त्याचा विचार व्हावा अशी भूमिका काही खासदारांनी घेतली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यानंतर एनडीएसोबत कायम राहण्याचा विचार होता, असा युक्तिवाद या फळीकडून केला जात आहे. अजित पवार निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याचा विचार मागे पडला असला तरी एनडीएत जाण्यात अडचण नसावी अशी दुसऱ्या गटाची भूमिका आहे.
सध्या आपला गट विरोधी पक्षात असल्यामुळे राज्यातील केंद्रातील मतदार संघाची कामे करताना अडचणी येत असल्याची नेत्यांची भावना असल्याची माहिती सूत्रांनी ‘एबीपी माझा’ला दिली. त्यामुळे आगामी काळात शरद पवार या दोन गटांपैकी कोणाचे ऐकणार हे बघावे लागेल. शरद पवार यांनी विरोधी बाकांवर बसण्याची भूमिका कायम ठेवली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदार फुटतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावेळी शरद पवार या आमदारांना कसे थोपवून धरणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, शरद पवार गटातील अनेक आमदार हे सत्तेत जाण्यासाठी आसुसले असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत शरद पवार आपला पक्ष एकसंध राखण्यात यशस्वी ठरणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
आणखी वाचा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही, रोहित पवारांना विश्वास, संजय दिना पाटलांवरही टीका
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?