Last Updated:
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यासह राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील ४८ ते ७२ तास मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि दमट हवामानाने हैराण झालेल्या पुणेकरांना रविवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने मोठा दिलासा दिला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यासह राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील ४८ ते ७२ तास मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस पुण्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, किनारी आंध्र प्रदेशापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत द्रोणिका रेषा सक्रिय झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही हवामान प्रणालींमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
रविवारी सकाळी पुण्यात ढगाळ वातावरण होते, मात्र दुपारी दोनच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. शिवाजीनगर, स्वारगेट, डेक्कन, कोथरूड, कात्रज, औंध, येरवडा, कल्याणीनगर आणि सिंहगड रस्ता या भागात जोरदार सरी कोसळल्या. यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
शहरात रविवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सोमवारी (ता. २९) पुणे आणि परिसरात कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
Pune,Maharashtra
Jun 29, 2026 11:19 AM IST
Pune Rain: पुणेकरांनो, घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच; पुढील 72 तास महत्त्वाचे, पुण्यासह 24 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
