Satyajeet Tambe on TET Exam Paper Leak: ‘भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था सुधारली जात नाही’; TET पेपरफुटीवर सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप


Satyajeet Tambe on TET Exam Paper Leak: महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर होणारी अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर आदल्या दिवशीच फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने ही परीक्षा तातडीने स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला. या परीक्षेला यंदा 4 लाख 28 हजारहून अधिक उमेदवार बसणार होते. या गंभीर प्रकारामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, राज्यातील प्रमुख नेत्यांनी यावर अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Satyajeet Tambe on TET Exam Paper Leak: नेमकं काय म्हणाले सत्यजीत तांबे?

यंत्रणेतील भ्रष्टाचारावर थेट बोट ठेवत आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “कधी MPSC… कधी NEET… आता TET! विभागातील भ्रष्टाचार हेच पेपर फुटीचे मुख्य कारण आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करावी लागली. या परीक्षेला यंदा 4 लाख 28 हजारांहून अधिक उमेदवार बसणार होते. काही दिवसांपूर्वी NEET, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC-NET आणि विविध प्रवेश व भरती परीक्षांमधील अनियमितता यामुळे प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो आणि यामुळे येणारी उदासीनता आणि मानसिक नैराश्य तर वेगळंच.

TET ची Case थोडी वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सेवेत राहण्यासाठी नोकरी असलेल्याही सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे 20-30 वर्षे सेवा केलेले शिक्षकही जे आपल्या सेवापूर्तीच्या अंतिम टप्प्यात आहे त्यांना सुद्धा आपली नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही परीक्षा पास करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांच्या स्वप्नांवर एकप्रकारे घाला घालण्याचंच पापच या व्यवस्थेने केले आहे.

आता देशाला स्वातंत्र्य मिळून लवकरच जवळपास 80 वर्षे होतील. जग Artificial Intelligence आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचलं आहे. पण आपण अजूनही पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्था उभी करू शकलो नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? आजही आपण MPSC चे निकाल वेळेवर देऊ शकत नाही, परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन घेतो. या सर्वच विषयांवर मी परवाच विधिमंडळात आवाज उठवत याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. खरंतर भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच ही व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही. ही सिस्टीम सुधारूच नये, ही व्यवस्था पारदर्शक होऊच नये, अशीच काहींची मानसिकता आहे, हे माझं ठाम मत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.   

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. “नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला! भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपने! गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवले आहे. दरवर्षी तरुण-तरुणींनी फक्त आंदोलनंच करायची का? आमच्या देशातील तरुणाईने आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची?,” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.  

Rohini Khadse: रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील सरकारवर टीका केलीय. “नीट पेपरफुटीचे उदाहरण ताजे असताना टीईटीने पेपर फुटू नये यासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवी होती. पण कुणाला काही पडले आहे का ? जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार ? टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करणारी ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालते? प्रत्येक वेळी पेपर फुटतो, चौकशीची घोषणा होते, काही जणांना अटक होते आणि काही दिवसांनी सर्व काही शांत होते. पण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील गेलेले महिने, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार?,” असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

TET Exam Paper Leak: भिवंडीत कशी झाली पोलखोल?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 28 जून 2026 रोजी संपूर्ण राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET 2026) घेण्याचे प्रस्तावित होते. मात्र, 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी धाड टाकली. तेथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दलची माहिती असल्याचे समजले. पडताळणी केली असता, त्यांच्याकडे सापडलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे उघड झाले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी कोचिंग क्लास चालकांसह काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी यासाठी ही परीक्षा सध्या पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारीख अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल.

आणखी वाचा 

MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, पुन्हा TET ची Exam कधी?; नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची A टू Z माहिती

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *