ठाणे : महाराष्ट्रासह देशातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांचे आयडॉल म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas nangare patil) यांची नुकतेच नागपुरात बदली करण्यात आली आहे. संघभूमी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड असलेल्या नागपूरच्या आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर, नुकतेच नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवत संघ परिवाराचे जोरदार कौतुक केले. त्यावरुन, त्यांच्यावर टीका होत असून मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही मनसेस्टाईलने त्यांच्यावर प्रहार केला. आता, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही एका वाक्यात खोचक टोला लगावला आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून जोरदार कौतुक केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्यावरुन आधी काँग्रेसने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता राज ठाकरेंनी देखील जोरदार सुनावलं आहे. “तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा,” असा सल्लाच राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना दिला. सध्या राजकीय मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी ‘पुनर्वसन हमी योजना’ सुरूच आहे, त्यामुळे तुमचीही सोय होईल, असेही त्यांनी म्हटले. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही एकाच वाक्यात खोचक टोला लगावला.
विश्वास नांगरे पाटील यांच्या संघ कार्यक्रमातील सहभागावरुन जितेंद्र अव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर, मला माहिती नव्हतं ते चड्डी घालतात, अशा शब्दात खोचक टोला आव्हाड यांनी लगावला. दरम्यान, विश्वास नांगरे पाटील हे आतापर्यंत राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. आता ते नागपूर शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळणार आहेत. नागपूरचे मावळते पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याजागी विश्वास नांगरे पाटील यांना जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या जागेवर, म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अपर पोलीस महासंचालक पदाची धुरा रवींद्र सिंघल यांच्याकडे देण्यात आली आहे.
सरकारला पेपरफुटीचं गांभीर्य राहिलं नाही
टीईटी पेपरफुटीवरुनही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. हे गंभीर नाही, महाराष्ट्राची परंपरा आहे, सर्वकाही फुटते, MPSC, MBBS NEET पेपर फुटते. फुटक्या सरकारला लोक जेव्हा गांभीर्याने घेत नाही, तेव्हा पेपरला कसे घेतील. याप्रकरणी आता दोषींना ताब्यात घेऊ या व्यतिरिक्त काही होणार नाही, सरकारला गंभीर घ्यायचे नव्हते, पेपर फुटले काय आणि डमी बसला काय? अशा शब्दात आव्हाड यांनी खंत व्यक्त केली.
हेही वाचा
मोठी बातमी! TED पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ