केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरीImage Credit source: एजन्सी
Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिस सर्वच अँगलने तपास करत आहेत. या खून प्रकरणाने देश हादरला आहे. या हत्येप्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतन आणि सियाचा साखरपुडा झालेला होता. पण सियाला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. तिचे चेतनवर प्रेम होते. त्यातून दोघांनी संगनमताने लोहगड किल्ल्यावरून केतन याला धक्का दिला. तो दरीत कोसळून ठार झाला. याप्रकरणी काल पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल याची दहा तास कसून चौकशी केली. साहिल आणि चेतन हे दोघेही मित्र होते. त्यामुळे ही चौकशी महत्त्वाची ठरली आहे. तर आज सियाचे आई-वडील चौकशीसाठी पोलिसांसमोर दाखल झाले आहेत.
साहिल गोयलची कसून चौकशी
काल माध्यमांशी बोलताना केतन अग्रवाल याचे वडील अनिल अग्रवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सियाचा भाऊ साहिल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे चांगले मित्र असल्याची माहिती दिली होती. तर मुख्यमंत्र्यांकडे हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची आणि ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची विनंती केली. या दोन्ही मागण्यांना सरकारने मंजूरी दिली आहे. तर काल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी साहिल गोयलची दहा तास कसून चौकशी केली. त्याची माहिती समोर आली नाही. पण चेतन आणि सियाचे प्रेम प्रकरण आणि या खूनासंबंधीची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज आई-वडील चौकशीसाठी हजर
केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर दोघेही लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. काल सियाचा भाऊ साहिल याची तब्बल दहा तास कसून चौकशी करण्यात आली होती त्यांना आता सियाचे आई वडील यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. यामध्ये अनेक खुलासे झालेले आहेत. आता सियाच्या आई-वडिलांकडून देखील अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या 18 जून रोजी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून ढकलले होते. खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला होता. यासाठी दोघांनी अनेक दिवसांपासून प्लॅनिंग केल्याचे, योजना आखल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांना त्यात लव्ह ट्रँगल सापडला. हा घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले. सियासह तिचा प्रियकर चेतनला अटक करण्यात आली आहे. तर दोन्ही कुटुंबातील आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
सियाच्या आई-वडिलांना चौकशीत कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार?
-सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का?
-सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?
-सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का?
-सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?
-सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?
-लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का?
-साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?
-लोहगडावर ते तीन वेळा गेले होते, त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती?
-केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?