मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार


MPSC Exams CBT Pattern : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा आता ओएमआर (OMR) उत्तरपत्रिकांऐवजी संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या नव्या सुधारणांमुळे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करणे आयोगाला शक्य होणार आहे.  यापूर्वी परीक्षांचे निकाल आणि पुढील टप्प्यांमध्ये मोठा विलंब होत असल्याने उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अनिश्चितता संपवण्यासाठी आयोगाने आता कालबद्ध नियोजन केले आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल आयोगाने अवघ्या 22 दिवसांत प्रसिद्ध करून एक नवा रेकॉर्ड केला आहे. यापुढे ही गती आणखी वाढवून सर्व पूर्व परीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आतच जाहीर केले जातील.

MPSC Recruitment Target : एकाच वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य

ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षाअखेरीस तिची अंतिम भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:

मुलाखत असलेली पदे : ज्या पदांसाठी मुलाखती आवश्यक असतात, त्यांची संपूर्ण निवड प्रक्रिया आता केवळ 9 ते 11 महिन्यांत पूर्ण केली जाईल.

केवळ लेखी परीक्षा असलेली पदे : ज्या पदांना मुलाखत नसते, अशा परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया 6 ते 7 महिन्यांत पूर्ण केली जाईल.

या गतिमान प्रक्रियेमुळे उमेदवारांचे वर्षानुवर्षे रखडणारे नुकसान टळणार असून त्यांच्या करिअरवरील अनिश्चिततेचे ढग दूर होतील, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.

MPSC Mains Exam Pattern : मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल नाही

ही सीबीटी (CBT) पद्धत केवळ आणि केवळ पूर्व परीक्षांसाठीच लागू असणार आहे. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’ किंवा गट ‘क’ च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक आणि ठरलेल्या पद्धतीनेच पार पडतील.

MPSC Exam New Pattern  : सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धत वैज्ञानिक

सीबीटी आणि नॉर्मलायझेशन (Normalization) ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रासाठी कोणतीही नवी पद्धत नाही. एमपीएससीने आतापर्यंत सुमारे 140 परीक्षा सीबीटी प्रणालीनुसार अत्यंत यशस्वीपणे घेतल्या आहेत. ही प्रणाली पूर्णपणे वैज्ञानिक, न्यायालयाने मान्यता दिलेली आणि देशभरात स्वीकारलेली पारदर्शक पद्धत आहे.

देशातील मोठ्या भरती संस्थांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दरवर्षी लाखो उमेदवारांची परीक्षा याच पद्धतीने घेते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (RRB) तर सुमारे 1 कोटी उमेदवारांची भरती परीक्षा याच सीबीटी आणि नॉर्मलायझेशनद्वारे यशस्वीपणे पूर्ण केली आहे. महाराष्ट्रातही ‘सीईटी सेल’ने नुकतीच 16.30 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा याच पद्धतीने घेतली असून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) देखील याच पद्धतीचा वापर करते. या डिजिटल पद्धतीमुळे पेपर फुटीचे आणि विलंबाचे प्रकार पूर्णपणे थांबून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होईल, असा ठाम विश्वास अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *