घटस्फोटानंतर ईशा देओलच्या आयुष्यातून रोमान्सच हरवला; म्हणाली “चुका होतात पण..” – Marathi News | Esha deol missing love in her life after divorce with bharat takhtani hema malini dharmendra daughter


ईशा देओल, भरत तख्तानीImage Credit source: Instagram

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओलने 2024 मध्ये पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला. लग्नाच्या अकरा वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर दोन्ही मुलींचं संगोपन हे दोघं मिळून करत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटानंतर आयुष्यात रोमान्स आणि प्रेमाची कमतरता जाणवत असल्याची प्रामाणिक कबुली तिने या मुलाखतीत दिली आहे. आयुष्याची ही सेकंड इनिंग सुरू असताना पुन्हा प्रेमाचं स्वागत करण्यासाठीही ईशा देओल तयार आहे.

‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “मला असं वाटतं की प्रेम आणि रोमान्स या माणसाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांची मला सध्या उणीव भासत आहे. मला रोमँटिक राहायला आवडतं. मी रोमकॉम्सची (रोमँटिक कॉमेडी) खूप मोठी चाहती आहे. मला रोमँटिक गाणी आणि कथा खूप आवडतात.” गेल्या काही वर्षांत, विशेषत: आधीच्या ब्रेकअप आणि घटस्फोटानंतर प्रेमाबद्दलचा तिचा दृष्टीकोन बदलला आहे का, असाही प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर ईशाने उत्तर दिलं, “नाही, या गोष्टी बदलत नाहीत. ब्रेकअप होतात. माझे लग्नाआधीही बॉयफ्रेंड होते आणि मी त्यांच्यासोबत ब्रेकअपही केलं आहे. या गोष्टी घडतात, पण त्यामुळे प्रेमाबद्दलचा माझा दृष्टीकोन बदलला नाही. आपण सर्वजण हेमाजी आणि धर्मेंद्रजी यांच्यातील निरपेक्ष प्रेम पाहून मोठे झालो आहोत.”

ईशा देओलने यावेळी घटस्फोटाबद्दल तिचे विचारही मोकळेपणे मांडले आहेत. “विभक्त होणं ही एक अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील बाब आहे. विशेषत: जेव्हा त्यात मुलांचा संबंध येतो, तेव्हा ही अधिकच खासगी बनते. मी आणि भरत विभक्त होण्याची बातमी चर्चेत यावी अशी माझी कधीच इच्छा नव्हती. परंतु आमचं आयुष्य सार्वजनिक असल्याने मला आणि भरतला हे माहीत होतं की ही परिस्थिती अत्यंत काळजीपूर्वक, सन्मानाने आणि संवेदनशीलतेने हाताळली गेली पाहिजे”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

याविषयी ईशा पुढे म्हणाली, “जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा मी इतरांचं मत विचारात घेत नाही. मी माझे निर्णय स्वत: घ्यायला प्राधान्य देते, कारण उद्या ते बरोबर असोत वा चूक, मी त्यासाठी कोणालाही दोष देणार नाही. मग ते चित्रपट असोत किंवा बॉयफ्रेंड. चुका होतात. त्या तुम्हाला अधिक कणखर बनवतात आणि तुम्ही त्यातून शिकता. कधीकधी लोकांना एखाद्याचा निर्णय योग्य वाटत नाही, पण प्रत्येक नात्याची एक कहाणी असते. ही केवळ महिलांचीच परिस्थिती नाही, तर पुरुषांचीही असू शकते. जर दोन चांगल्या व्यक्तींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला तर आशा आहे की ते आदरपूर्वक आणि सामंजस्याने पुढे जाण्याचा एक चांगला मार्ग शोधू शकतील.”

ईशा देओल 13 वर्षांची होती, तेव्हापासून भरत तिच्यावर प्रेम करायचा. हे दोघं शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात. दोघांची शाळा वेगवेगळी असल्याने फार कमी वेळा त्यांची एकमेकांशी भेट व्हायची. शाळेनंतर जवळपास 10 वर्षे दोघं एकमेकांच्या संपर्कात नव्हते. दहा वर्षांनंतर जेव्हा ईशा आणि भरत एकमेकांसमोर आले, तेव्हा भरतने तिला प्रपोज केलं होतं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *