शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ई-केवायसी पूर्ण न केल्यास पीएम किसानचा पुढील हप्ता बंद होणार, ही आहे शेवटची तारीख | शेती बातम्या


Last Updated:

जिल्ह्यातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत असले तरी अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील हप्त्याच्या वितरणावेळी अशा शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

News18
News18

बीड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत असले तरी अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील हप्त्याच्या वितरणावेळी अशा शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी पीएम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना मानली जाते. वर्षातून तीन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते. या निधीचा उपयोग शेतीच्या विविध कामांसाठी होत असल्याने अनेक शेतकरी या योजनेवर अवलंबून आहेत. मात्र, लाभ नियमित मिळावा यासाठी लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.

योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी तसेच अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये यासाठी शासनाने ई-केवायसीची सक्ती केली आहे. लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे का, खाते कार्यरत आहे का आणि लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे का याची खात्री करण्यासाठी ही पडताळणी महत्त्वाची ठरत आहे. ई-केवायसी न झाल्यास पुढील हप्त्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी तातडीने जवळच्या सेवा केंद्रात किंवा अधिकृत माध्यमातून ई-केवायसी करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. अनेक शेतकरी माहितीअभावी ही प्रक्रिया पुढे ढकलत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

दरम्यान, वृद्ध, दिव्यांग किंवा आजारी शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा लाभार्थ्यांना घरबसल्या ई-केवायसीची सेवा मिळावी यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी तसेच अधिकृत सीएससी केंद्र चालक त्यांच्या घरी भेट देऊन फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करून देणार आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या सुविधेचाही लाभ घेण्याचे, आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ई-केवायसी पूर्ण न केल्यास पीएम किसानचा पुढील हप्ता बंद होणार, ही आहे शेवटची तारीख



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *