Last Updated:
Mamachya Govyala Jauya : मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज झाला आहे. टीझरचा शेवट अजिबात चुकवू नका.
मराठी सिनेसृष्टीत सध्या एका नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मैत्रीची एक वेगळीच क्रेझ दाखवणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागली असतानाच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
टीझरची सुरुवातच एका भन्नाट आणि नॉस्टॅलजिक गोव्याच्या वाईब्सने होते. यात ‘स्ट्रगलर साला’चे तीन जिगरी मित्र कुशा, बाबा आणि संत्या आणि त्यात नव्याने सहभागी झालेला मामा दिसतोय. मराठीतील मनोरंजनाचे चार हुकमी एक्के म्हणजेच अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर एकत्र आल्यावर पडद्यावर काय राडा होऊ शकतो, याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. मित्रांची जुनी मैत्री, गोव्याची ट्रिप, त्यात येणारे मजेशीर ट्विस्ट आणि टर्न्स आणि सोबतीला कडक बॅकग्राउंड म्युझिक यामुळे हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिग्दर्शक विजू माने या भन्नाट टीझरबद्दल म्हणाले, “आज हजारो प्रेक्षकांसोबत हा टीझर लाँच करण्याची संधी आम्हाला मिळाली, यासाठी मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. हा चित्रपट प्रत्येक मित्रांच्या ग्रुपची गोष्ट आहे. टीझरच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना या भन्नाट प्रवासाची एक लहानशी झलक दाखवली आहे.”
“चित्रपटगृहात जेव्हा मोठ्या पडद्यावर या गँगला प्रेक्षक एकत्र पाहातील, तेव्हा प्रेक्षकांना हसून हसून वेड लागेल. फ्रेंडशिप डेच्या वीकेंडला मित्रांसोबत थिएटर्समध्ये एन्जॉय करण्यासाठी हा परफेक्ट सिनेमा आहे. मला खात्री आहे, इथे उपस्थित प्रत्येक प्रेक्षक हा चित्रपट आवर्जून पाहायला जातील.”
‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. 31 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mumbai,Maharashtra
गोवा जाना हैं तो दारू, चकना और..! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चा धमाल टीझर, शेवट अजिबात मिस करू नका
