Crime Files: 600 कोटींची संपत्ती, 2 लग्न आणि 4 मुली, पण ‘ती’ला तुळशी वृदांवनाच्या खाली पुरलं, दृश्यम स्टाईल मर्डर मिस्ट्री | राष्ट्रीय बातम्या


रिअल इस्टेट डेव्हलपर. श्रीमंत वारस. समाजात “Larger than life” व्यक्तिमत्त्व मानली जाणारी स्त्री पण 1991 साली ती अचानक गायब झाली आणि पुढची तीन वर्षं तिचा मृतदेह कुठे होता, हे जगाला माहीत नव्हतं. तो होता तिच्याच घराच्या अंगणात. तिच्या स्वतःच्या तुळशी वृंदावनाखाली आणि सर्वात भीषण गोष्ट forensic पुराव्यांनुसार, जेव्हा तिला त्या लाकडी पेटीत ठेवण्यात आलं ती जिवंत होती.

ती कोण होती?

27 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळून बारा दिवस झालेले होते. मद्रासच्या एका कुलीन भारतीय-पर्शियन मुस्लिम कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. तिचे आजोबा सर मिर्झा इस्माईल म्हैसूर, जयपूर, हैदराबाद तीन रियासतींचे दिवाण.तिचे पणजोबा आगा अली असकर बंगळुरूच्या वास्तुशास्त्रीय इतिहासातलं एक मोठं नाव. तिचे वडील गुलाम हुसैन नमाझी — सिंगापूरच्या Capitol Theatre चे संस्थापक. म्हणजे शकेरहच्या रक्तातच श्रीमंती, सत्ता आणि प्रतिष्ठा होती. ती सिंगापूरमध्ये शाळेत गेली. इंग्लंडशी, मध्य पूर्वेशी, दक्षिण आशियाशी जोडलेल्या त्या कुटुंबात पैसा एक प्रश्नच नव्हता.

1965 साली अठराव्या वर्षी तिचं लग्न झालं स्वतःच्या मावस भावाशी अकबर मिर्झा खलीली. मातांचं सख्खं नातं होतं. दोन्ही बहिणी सर मिर्झा इस्माईलच्या मुली. अकबर हे साधा माणूस नव्हते. लॉयला कॉलेजमधून कायद्याची पदवी. दक्षिण भारतातला सर्वोत्तम टेनिसपटू मानला गेलेला तरुण आणि शेवटी 1954 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल. लग्नानंतर अकबर बगदाद, कोलंबो, पॅरिस, अम्मान जिथे पोस्टिंग, तिथे शकेरह सोबत.

चार मुली झाल्या

Zeebundeh — मद्रासमध्ये जन्मलेली

Sabah — दिल्लीत

Rehane — पॅरिसमध्ये

Esmath — जॉर्डनच्या अमानमध्ये

बाहेरून बघितलं तर एक परिपूर्ण कुटुंब मात्र आतून एक स्त्री जी हळूहळू एकटी पडत होती.

बंगळुरूचा त्या वर्षीचा टर्निंग पॉइंट

अकबरांची शेवटची मोठी पोस्टिंग होती इराणला भारतीय राजदूत म्हणून. पण इराणी क्रांतीच्या काळात शकेरह त्यांच्यासोबत राहू शकली नाही. तिने बंगळुरू निवडलं तिथे तिने स्वतःची एक वेगळा ओळख तयार करायला सुरुवात केली रिअल इस्टेट डेव्हलपर. पणजोबांच्या वारशाला पुढे नेणारी इमारती बांधल्या. सँकी रोडवरचं कुटुंबाचं घर. आई असकर रोडवरचं घर. वडिलोपार्जित बंगल्यांचा पुनर्विकास केला काही भाडेकरूंना हटवून. ती एका वेगळ्या बिझनेस वूमनमध्ये बदलत होती, पण आत कुठेतरी ती एकटी होती. पती बाहेरगावी, मुली मोठ्या होत होत्या. आजूबाजूचा समाज मोठ्या नातेसंबंधांच्या तालावर चालणारा आणि याच काळात 1982 साली तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आला. ज्याने स्वतःला स्वामी श्रद्धानंद म्हणून ओळख करून दिली होती. तांत्रिक शक्ती असल्याचा दावा करणारा भगव्या वस्त्रांत. त्याची पहिली भेट शकेरह आणि अकबर दोघांशीही बंगळुरूतच झाली पण लक्ष शकेरहवर होतं.

तो स्वामी खरंच कोण होता?

स्वामी श्रद्धानंद हे फक्त एक नाव होतं. खरं नाव मुरली मनोहर मिश्रा होतंमूळचा मध्य प्रदेशच्या सागर शहरातला त्याचे वडील एक साधा शाळेतला शिक्षक. तो स्वतः शाळेतून पळून गेलेला, गरीब घराचा एक तरुण. कुठेतरी वाटेत त्याने स्वतःला नवीन नाव दिलं “स्वामी श्रद्धानंद”. स्वतःला तांत्रिक म्हणवायला सुरुवात केली. कानपूरच्या एका राजघराण्याच्या म्हणून त्याने सुरुवात केली, असं नंतरच्या तपासात पुढे आलं. म्हणजे ज्या माणसाने एक दिवस म्हैसूरच्या दिवाणाच्या नातीच्या आयुष्यात पाऊल ठेवलं तो खरं तर कुणाच्या तरी घरात निरोप पोहोचवणारा मुलगा होता. पण त्याच्याकडे एकच भांडवल होतं.पुरुषाची विश्वास संपादन करण्याची क्षमता. विशेषतः अशा स्त्रियांच्या आयुष्यात  ज्यांच्याजवळ सगळं होतं पण त्या एकट्या होत्या. शकेरहकडे चार मुली होत्या तिच्या मनात एक खंत होती तिला एक मुलगा हवा होता आणि स्वामी श्रद्धानंदाने नेमकं तेच आश्वासन दिल्याचा आरोप आहे, माझ्याकडे तांत्रिक शक्ती आहे. मी तुला मुलगा देऊ शकतो. ही एक वाक्यं एका स्त्रीच्या आयुष्याची दिशाच बदलणार होती.

घटस्फोट आणि नवं लग्न

1985 साली अकबर इराणहून परत आला शकेरहने त्यांच्याकडे घटस्फोट मागितला. अकबरांनी नकार दिला मग शकेरहने एक धक्कादायक निर्णय घेतला . ती मद्रासच्या एका मशिदीत गेली, आणि स्वतःला सिंगल म्हणून घोषित केलं. मुली वडिलांकडे इटलीला गेल्या आणि अवघ्या सहा महिन्यांत एप्रिल 1986 मध्ये शकेरह खलीलीने स्वामी श्रद्धानंदाशी लग्न केलं. म्हैसूरच्या दिवाणाची नात. इराणच्या भारतीय राजदूताची माजी पत्नी. सिंगापूरमध्ये शिकलेली. कोट्यवधींची मालकीण. आता एका मध्य प्रदेशच्या शाळा-सोडलेल्या पुरुषाची पत्नी. कुटुंब विभागलं पण शकेरहच्या मनात एकच ध्यास मुलगा होईल.

अम्मा आणि Tea in bed

लग्नानंतरही स्वामीचं वागणं अत्यंत बेमालूम होतं, असं नंतर तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. तो शकेरहला “अम्मा” म्हणायचा तिच्या पायांजवळ बसायचा. जर त्याचा हात चुकून तिला लागला तर तो “पापमुक्तीसाठी” तळमळायचा. रोज सकाळी 10 वाजता तो तिच्या बेडवर चहा आणि वर्तमानपत्र घेऊन यायचाम्हणजे बाहेरून बघणाऱ्याला तो एक “सेवक” वाटायचा आणि शकेरहला वाटायचं हा माणूस मला फक्त आदराने पाहतो पण आत काहीतरी वेगळंच चाललं होतं. शकेरहने हळूहळू तिच्या संपत्तीवर त्याला Power of Attorney दिली. तिच्या सर्व बँक खात्यांत त्याला joint holder बनवलं तिच्या lockers ची किल्ली त्याच्या हातात गेली. ते एकत्र जगभर फिरले फर्स्ट क्लास प्रवास, सेव्हन स्टार हॉटेल्स. रेकॉर्डनुसार, शकेरहने आपल्या काही मौल्यवान जागा विकल्या आणि तो पैसा त्या प्रवासात आणि स्वामीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये गुंतवला. स्वामीने एका टप्प्यावर तिला सांगितल्याचा दावा होता, माझ्या तांत्रिक शक्तीने तुला मुलगा झाला. पण कथेनुसार, तो मेलेला मुलगा होता आणि याच क्षणी कदाचित शकेरहच्या मनात पहिल्यांदा संशय निर्माण झाला असेल पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

28 एप्रिल 1991, ती शेवटची सकाळ

लग्नानंतर त्यांच्यात भांडणं वाढत गेली मुख्यतः पैशावरून असं नंतर पुढे आलं.

शकेरह मुलींशी नातं पुन्हा जोडू पाहत होती. स्वामीला हे आवडत नव्हतं. स्वामीला माहीत होतं जर ती मुलींकडे परतली, जर तिच्या मनात संशय वाढला, तर तिच्या संपत्तीवरचा त्याचा ताबा कधीही जाऊ शकतो. म्हणून त्याने एक थंड डोक्याने कट रचण्यास सुरूवात केली. बंगळुरूच्या 81 Richmond Road वर शकेरहचं एक प्रशस्त बंगला होता त्या बंगल्याच्या अंगणात एका रात्री एक खड्डा खणला गेला. 6 फूट लांब, 2 फूट रुंद लाकडी पेटीसारखा खोकं, चाकं असलेलं आत गादी टाकलेली आणि 28 एप्रिल 1991 दिवशी स्वामी शकेरहसाठी चहा घेऊन गेला नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता, बेडवर पण त्या दिवशी चहामध्ये काहीतरी वेगळं होतं. झोपेच्या गोळ्या मिसळलेल्या होत्या शकेरहने तो चहा प्यायला, काही वेळातच ती बेशुद्ध झाली. स्वामीने तिला उचललं, तिला त्या लाकडी पेटीत ठेवलं मग पेटीवर झाकण लावलं आणि त्या झाकणावर खिळे ठोकले. मग ती पेटी आधीच खणून ठेवलेल्या त्या खड्ड्यात ठेवली वर माती, वर वाळू, वर दगडी फरशा आणि सर्वात वर एक तुळशीचं रोप. एक साधंसं तुळशी वृंदावन. भारतीय घरात आढळणारं.

नेमकं काय घडलं? 

सर्वात भीषण सत्य जेव्हा 1994 मध्ये पोलिसांनी ती पेटी उघडली तेव्हा फॉरेन्सिक तज्ज्ञांनी आत बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शकेरहचा एक हात गादीला घट्ट पकडलेला होता. एका मेलेल्या माणसाची बोटं अशी पकडू शकत नाहीत.ती बोटं तेव्हाच आकार घेतात , जेव्हा माणूस शुद्धीवर येऊन सुटण्यासाठी धडपड करतो.म्हणजे झोपेच्या गोळ्यांनी ती बेशुद्ध झाली होती. पेटीत ठेवली गेली खिळे ठोकले गेले पुरली गेली आणि कधीतरी माती वर पडत असताना किंवा त्यानंतर ती शुद्धीवर आली. त्यावेळी बाहेर पडण्यासाठी ती धडपड करत होती. त्यावेळी तिने तो गादी पकडला आणि त्याच अवस्थेत  गुदमरून तिचा अंत झाला.

कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल 

2005 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर प्रेम केलं, त्याच्याशी लग्न केलं. त्याने तो विश्वास वापरून तिला जिवंत पुरलं. तीन वर्षं त्याच घरात अनेक पार्ट्या झाल्या शकेरह मेली होती, तिचा मृतदेह त्या अंगणात पुरला होता. पण स्वामी श्रद्धानंद त्याच घरात राहत राहिला पुढची तीन वर्षं. त्याच Richmond Road वरच्या बंगल्यात, त्याच अंगणात ज्याच्या काही फूट खाली शकेरह पुरली होती. जेव्हा कुणी विचारायचं “शकेरह कुठे आहे? त्याचं उत्तर ठरलेलं ती लांब प्रवासाला गेली आहे. सध्या परदेशी आहे. आणि सर्वात भीषण भाग नंतर पुढे आला तो स्वामीने त्याच अंगणात पार्टी होस्ट केल्या असल्याचा दावा. म्हणूनच 2023 मध्ये Amazon Prime वर आलेल्या डॉक्युमेंट्रीचं नाव ठेवलं गेलं “Dancing on the Grave. कारण कागदोपत्री शकेरह जिवंत होती. स्वामीने एक कंपनी सुरू केली होती SS Finance Ltd ज्यात शकेरह सक्रिय भागीदार म्हणून दाखवलेली होती म्हणजे मेलेल्या स्त्रीच्या नावाने पुढची चार वर्षं व्यवहार चालू होते.

मुलीचा सहा वर्षांचा शोध

पण एका व्यक्तीने हार मानली नाही. शकेरहची दुसरी मुलगी सबाह बकाचे. ती इटलीत राहत होती वडिलांकडे पण आईशी संपर्क तुटला होता. फोन लागत नव्हते. पत्र पोहोचत नव्हती, वाढदिवसाला संदेश नव्हते. सबाहच्या मनात संशय वाढत गेला. ती बंगळुरूला आली. स्वामीला विचारलं. स्वामीने उडवाउडवीची उत्तरं दिली. 1992 साली सबाहने एक मोठं पाऊल उचललं. अशोकनगर पोलीस स्टेशन, बंगळुरूत तिने Habeas Corpus याचिका दाखल केली.माझी आई कुठे आहे? तिचा मृतदेह तरी दाखवा.पोलीस तपास सुरू झाला. पण पुरावे नव्हते. मृतदेह नव्हता, साक्षीदार नव्हते.स्वामी प्रत्येक वेळी सहज बाहेर पडत होता. तीन वर्षं सबाहने हार मानली नाही, शेजारी संशय व्यक्त करत होते, पत्रकार आता प्रश्न विचारत होते. आणि कर्नाटक पोलिसांनी अखेर एक तीन वर्षांचा ऑपरेशन सुरू केला. मे 1994 मध्ये खोदकाम सुरू अखेर एका टप्प्यावर स्वामी कोलमडला. पोलिसांच्या मते, त्याने स्वतःच गुन्ह्याची कबुली दिली.

इतिहासातला पहिला खटला

भारतीय न्यायिक इतिहासातला पहिला खटला होता ज्यात उत्खनन प्रक्रिया video वर रेकॉर्ड झाली DNA चाचणी पुरावा म्हणून स्वीकारली गेली. खटला 1997 साली सुरू झाला, आठ वर्षं चालला. २१ मे २००५ — Civil and Sessions Judge B.S. Totad यांनी निकाल दिला. स्वामी श्रद्धानंद फाशीची शिक्षा दिली. न्यायाधीशांनी निकालात लिहिलं या हत्येने कुटुंबाच्या आणि समाजाच्या मनात इतकी भीती निर्माण केली आहे की त्यांना शांतपणे जगणं अशक्य झालं आहे. कमी शिक्षा देण्यासाठी कुठलीही mitigating circumstances नाहीत. १२ सप्टेंबर २००५  कर्नाटक उच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षा कायम ठेवली. “Rarest of rare” म्हणून.

स्वामीने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं

22 जुलै 2028 सर्वोच्च न्यायालयाने फाशीचा निकाल जन्मठेपेत बदलला पण एक अट होती Life imprisonment without remission, without parole.म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगातच.सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या गुन्ह्याचं वर्णन केलं “A man’s vile greed coupled with devil’s cunning.”

30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात

अकबर मिर्झा खलीली मुलींना सोबत घेऊन इटलीला परतले. ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बनले. आपलं राजनैतिक करिअर त्यांनी कायम ठेवलं. सबाह आजही माध्यमांत बोलते. Dancing on the Grave डॉक्युमेंट्रीत तिचं नाव प्रमुखाने येतं. ती ज्या लढाईने न्याय मिळवला ती लढाई आता textbook case म्हणून शिकवली जाते. स्वामी श्रद्धानंद उर्फ मुरली मनोहर मिश्रा — आज ८५+ वर्षांचा. मध्य प्रदेशच्या सागर सेंट्रल जेल मध्ये. वयानुसार अनेक आजार. नुकतीच त्याची mercy plea सर्वोच्च न्यायालयाने नाकारली. 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आणि अजूनही मी निर्दोष आहे, असं तो म्हणत राहतो.

अख्खा देश हादरला

शकेरह खलीली पुरली गेली त्याला आता तीन दशकांहून अधिक काळ झाला. ती गोष्ट जेव्हा 1994 साली बाहेर आली तेव्हा संपूर्ण देश थबकला. पण आज ती कथा पुन्हा सांगायची एकच कारण आहे.कारण शकेरह म्हैसूरच्या दिवाणाची नात होती. कोट्यवधींची मालकीण होती. परराष्ट्र सेवेच्या अधिकाऱ्याची पत्नी होती. सिंगापूरमध्ये शिकलेली होती. तरीही एका सामान्य भगव्या वस्त्रांच्या मुखवट्याने तिला फसवलंमग आपण कोणत्या भरवशावर म्हणावं माझ्यासोबत असं घडणार नाही”? जर शिक्षण, संपत्ती, सामाजिक दर्जा, राजनैतिक संरक्षण  हे सर्व असूनही शकेरह वाचली नाही. विश्वास हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. पण चुकीच्या माणसावर ठेवलेला विश्वास हाच त्याची सर्वात मोठी जखम.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *