पोलिसांपासून लपण्यासाठी चतुर चेतनचा प्लॅन, सियाला ३ सेकंदाचा कॉल, नंतर ९ तास नेट बंद, कामगाराचा फोन वापरला पण एका चुकीने सापडला! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Ketan Agrwal Murder Case Pune: सिया गोयल हिचा प्रियकर चेतन चौधरी हा स्वतःला पोलिसांपेक्षा हुशार समजत होता. पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये आणि आपलं लोकेशन पुण्यातच दिसावं, यासाठी त्याने एक चाल खेळली होती.

चेतन चौधरी स्वतःला पोलिसांपेक्षा हुशार समजत होता!
चेतन चौधरी स्वतःला पोलिसांपेक्षा हुशार समजत होता!

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील तरुण संचालक केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ल्यावरील गूढ मृत्यूने खळबळ उडवून दिली होती. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात वाटत होता. पण पुणे पोलिसांनी जेव्हा खोलात जाऊन तांत्रिक तपास केला तेव्हा जे सत्य समोर आले त्याने खाकी वर्दीही चक्रावून गेली. केतनचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर तो त्याच्याच होणाऱ्या बायकोने आणि तिच्या प्रियकराने अतिशय थंड डोक्याने रचलेला एक भयानक मर्डर प्लॅन होता!

प्रेमाचा त्रिकोण अन् खुनाचा कट

केतन अग्रवाल याचं लग्न सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं, लग्नाची खरेदी सुरू होती. पण सियाच्या मनात काही वेगळंच शिजत होतं. सियाचं विशी ओलांडलेलं वय आणि तिचं चेतन चौधरी याच्यावर असलेलं जीवापाड प्रेम! केतनशी लग्न करणं तिला अजिबात मान्य नव्हतं. आपल्या प्रेमाच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या केतनला कायमचं कसं संपवायचं? यासाठी सिया आणि चेतनने एका कॅफेमध्ये बसून मास्टरप्लॅन बनवला.

याआधीही महाबळेश्वरच्या ट्रिप दरम्यान केतनला मारण्याचा आणि लोहगडावर रेकी रेकून एका बाजूला नेऊन तिथेच त्याला संपविण्याचा प्रयत्न सियाने केला होता. बालीला प्री वेडिंग शूट होऊ नये म्हणून सियाने केतनचा पासपोर्ट टराटरा फाडून वॉशरुममध्ये फेकून दिला होता, जेणेकरून त्यांची नियोजित बाली ट्रिप कॅन्सल व्हावी आणि त्यांना प्लॅन अंमलात आणायला वेळ मिळावा. अखेर लोहगडाच्या टोकावर केतनला घेऊन जाण्यात सिया यशस्वी झाली.

शातीर चेतनचा डाव, ३ सेकंदांचा कॉल, पोलिसांना चकवण्यासाठी सगळे प्रयत्न केले

चेतन चौधरी हा स्वतःला पोलिसांपेक्षा हुशार समजत होता. पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये आणि आपलं लोकेशन पुण्यातच दिसावं, यासाठी त्याने एक चाल खेळली. घटनेच्या दिवशी त्याने आपल्या दुकानातील एका कामगाराला गाठलं. मला महत्त्वाचं काम आहे, असं सांगून त्याने त्या कामगाराचा मोबाईल स्वतःकडे घेतला आणि आपला स्वतःचा मोबाईल दुकानातच ठेवला.

सियाला चेतनने केवळ तीन सेकंदाचा एक फोन केला. त्यानंतर त्याच्या मोबाईलचे इंटरनेट चक्क नऊ तास बंद होते. त्याला वाटलं, आपण पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. डिजिटल युगात आपले लोकेशन पुण्यातच दिसेल आणि आपण केलेलं कृत्य लपून जाईल पण त्याला माहिती नव्हते कानून के हात लंबे होते है!

महत्त्वाचे म्हणजे १८ जून रोजी ज्या दिवशी केतनची हत्या झाली, त्या दिवशी चेतनच्या मोबाईलवर अनेकांचे कॉल आले. परंतु त्यातील एकही फोन चेतनने उचलले नव्हते. चेतनचा फोन कामगाराकडे असल्याने त्यानेच हे फोन उचलून ‘त्यांचा फोन’ दुकानात असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी ज्यावेळी कॉल रेकॉर्ड काढले त्यावेळी त्यांच्या हीच गोष्ट लक्षात आली. ज्या कुणी चेतनला त्यादिवशी फोन केले, त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावून घेतले. त्यावेळी चेतनने आमचे फोन उचललेच नाही, त्याच्या दुकानातील कामगाराने आमचे फोन उचलले, असे संबंधितांनी सांगितले. हे ऐकल्यावर चेतनचा या संपूर्ण प्रकरणात महत्वाचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलीस तपासात चेतनच्या फोनचे ज्यावेळी लोकेशन काढण्यात आले तसेच सीडीआर चेक करण्यात आले, त्यावेळी चेतन आणि सियाचे फोनवरून बोलणे झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी अधिक खोलात जाऊन तांत्रिक विश्लेषण केले असता, पोलिसांना लोकेशन कळू नये यासाठी कामगाराचा मोबाईल फोन नेल्याचे चेतनने चौकशीत सांगितले.

ओळख लपवण्यासाठी हुडी आणि गॉगलचा वापर, पण पोलिसांनी ओळखलंच

लोहगडावर जाणाऱ्या रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पाहिल्यानंतर सिया आणि केतनच्या गाडीमागे एक मुलगा त्यांचा पाठलाग करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. उन्हाने नको नको झालेले असताना मुलाने हुडी घालून प्रवास का केला असावा, याचे कोडे पोलिसांना पडले. त्यानंतर पोलिसांनी लोहगड परिसरातील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, संबंधित मुलगा तिथेही आलेला पोलिसांना दिसला. मग मात्र या मुलाचे सियाशी काहीतरी कनेक्शन असावे, याची पोलिसांना खात्री पटली. नंतर सियाच्या चौकशीत तिने केलेल्या कृत्याची कबुली दिली. एका हुडी घातलेल्या पोरामुळे आणि त्याच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

पोलिसांपासून लपण्यासाठी चतुर चेतनचा प्लॅन, सियाला ३ सेकंदाचा कॉल, नंतर ९ तास नेट बंद, कामगाराचा फोन वापरला पण एका चुकीने सापडला!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *