Padma Awards : रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव


नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘पद्म पुरस्कारांचे’ (Padma Awards) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘गणतंत्र मंडप’ येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आलं. या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील अतुलनीय आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पद्म’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

महाराष्ट्रातील मान्यवरांपैकी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला. वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा (Bhiklya Ladkya Dhinda) यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या भव्य समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अनेक केंद्रीय मंत्री आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. पद्म पुरस्कार वितरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील एकूण 65 मान्यवरांना (2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री) पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Padma Bhushan Alka Yagnik : पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना ‘पद्मभूषण’

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या पुरस्कारांमध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांना कला क्षेत्रातील त्यांच्या अद्भूत योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ (Padma Bhushan) पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यांनी 16 हून अधिक भाषांमध्ये 2 हजारांपेक्षा जास्त गाणी गाऊन भारतीय संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे.

Padma Shri Winners Maharashtra List : महाराष्ट्रातील ‘या’ 6 दिग्गजांना ‘पद्मश्री’

क्रीडा, कला, संगीत, चित्रपट, वैद्यकीय आणि उद्योग क्षेत्रात राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या खालील ६ मान्यवरांना ‘पद्मश्री’ (Padma Shri) पुरस्कार प्रदान करण्यात आला:

सन्मानित मान्यवर क्षेत्र विशेष योगदान / कामगिरी

रोहित शर्मा

(Rohit Sharma)

क्रीडा (क्रिकेट) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध. भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.

आर. माधवन

(R. Madhavan)

कला (चित्रपट) ‘थ्री इडियट्स’, ‘विक्रम वेधा’ सारख्या चित्रपटांतील अभिनय आणि ‘रॉकेट्री’ चित्रपटाच्या सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी गौरव.

डॉ. आर्मिडा फर्नांडिस

(Dr. Armida Fernandez)

वैद्यकीय क्षेत्र भारतातील नवजात शिशुवैद्यकशास्त्राच्या अग्रणी तज्ज्ञ. १९८९ मध्ये मुंबईतील सायन रुग्णालयात आशियातील पहिली ‘मानवी दूध बँक’ सुरू केली.

भिकल्या लाडक्या धिंडा

(Bhiklya Ladkya Dhinda)

कला (लोकसंगीत) वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे ८९ वर्षीय तारपावादक. बांबू व सुक्या भोपळ्याचे १० फुटी तारपा वाद्य वाजवण्यात कुशल.

अशोक खाडे

(Ashok Khade)

उद्योग क्षेत्र माझगाव डॉकमधून सुरुवात करत १९९२ मध्ये ‘दास ऑफशोअर’ या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनीची स्थापना केली.

सतीश शाह (मरणोत्तर)

(Satish Shah)

कला (अभिनेते) चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवर ४ दशकांहून अधिक काळ योगदान. त्यांचा पुरस्कार बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.

Padma Awards Winners List : यंदाच्या पद्म पुरस्कारांचे संपूर्ण गणित

यंदा केंद्र सरकारने देशात एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. या संपूर्ण यादीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:

एकूण पुरस्कार : 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री.

महिलांचा सहभाग : एकूण पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश आहे.

मरणोत्तर सन्मान : देशातील 16 दिवंगत मान्यवरांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील या सातही सुपुत्रांनी आणि सुकन्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या अथांग कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतल्यामुळे संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *