Ketan Agarwal Lohgad Murder Case: ऐतिहासिक लोहगड किल्ले परिसरात 18 जून रोजी 26 वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे कालपर्यंत मानल्या जात होते. पण हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही याचा अंदाज पोलिसांना अगोदरच आला होता. एका योजना आखून अगदी थंड डोक्याने हा खून केल्याचा पोलिसांना अंदाज आला होता. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झाला. डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि किल्ल्यावरील घडामोडींनी तपासाची दिशा बदलली. ही मर्डर मिस्ट्री पोलिसांनी एका क्लू आधारे सोडवली. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचा डाव पोलिसांनी उघड केला.
सिया गडबडली नि पकडल्या गेली
केतन अग्रवालचा अंत्यसंस्कार झाला. त्यानंतर चार दिवसांनी सिया गोयल ही अग्रवाल कुटुंबाच्या भेटीसाठी आली. केतनच्या बहिणीने सियाला काही प्रश्न विचारले. तेव्हा तिचे उत्तर संशयास्पद वाटले. केतनच्या बहिणीचा सियावर संशय बळावला. तिने कुटुंबासोबत ही बाब शेअर केली. त्यांनी पोलिसांशी चर्चा केली आणि प्रकरणाची दिशा बदलली. तपास पुढे सरकला तसा सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यात जवळपास 238 तास फोनवर गप्पा झाल्याचे समोर आले. दोघांमधील या दीर्घ संभाषणाने तपास यंत्रणांचे लक्ष वेधले.
आणि मिळाला तो क्लू
पोलिसांनी तपासात 18 जून रोजी, केतनच्या खूनाच्या दिवशीच्या घडामोडींवर लक्ष केंद्रीत केले. त्यावेळी चेतन चौधरी याचा पोलिसांना एक क्लू मिळाला. सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटापर्यंत चेतन चौधरीचे इंटरनेट बंद असल्याचे समोर आले. पोलिसांना हा कळीचा मुद्दा मिळाला. चेतन चौधरी याने मुद्दाम त्याचा मोबाईल दुकानामध्येच ठेवला होता. तो दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन लोहगड येथे पोहचला होता. आपला ठावठिकाणा माहिती होऊ नये यासाठीच त्याने हा बनाव केला होता. डिजिटल पुराव्यामुळे या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. त्याआधारे सियाचा खतरनाक प्लॅन समोर आला. पण या सर्व प्रकरणात एका निष्पाप तरूणाचा बळी गेला. त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला.