Last Updated:
सोलापूर विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मैदानातून काही जणांनी फटाके वाजवण्यास सुरुवात केली. या फटाक्यांमुळे सोपल यांच्या घराच्या परिसरातील झाडांना भीषण आग लागली.
बार्शी : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बार्शीमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निवडणुकीत भाजपचे राजाभाऊ राऊत यांच्या विजयानंतर, त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात मध्यरात्री फटाके फोडून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फटाके फोडून आग लावली, ठाकरे सेनेचा गंभीर आरोप
सोलापूर विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मैदानातून काही जणांनी फटाके वाजवण्यास सुरुवात केली. या फटाक्यांमुळे सोपल यांच्या घराच्या परिसरातील झाडांना भीषण आग लागली. हा प्रकार केवळ विजय साजरा करण्यासाठी नव्हता, तर जाणीवपूर्वक सोपल यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता, असा आरोप ठाकरे सेनेने केला आहे.
सोपलांचे दीड लाखांचे नुकसान
आगीत आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरातील आंबा, जांभूळ आणि आजूबाजूच्या इतर झाडांचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर बार्शी शहरात एकच खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला. कुणाला तरी खुश करण्यासाठी आणि राजकीय द्वेषातून असे प्रकार करण्यात आले आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात नाथा मोहिते, योगेश लोंढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, अंबादास रणझुंजारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बार्शीतील जुन्या राजकीय वैराची किनार
बार्शी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार राजेंद्र राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांमधील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील तीव्र वादामुळे बार्शी विधानसभा नेहमीच चर्चेत असते. आता विधान परिषदेच्या निकालानंतर थेट आमदाराच्या निवासस्थानाजवळ घडलेल्या या अग्नितांडवामुळे दोन्ही गटांतील दरी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Solapur,Maharashtra
