Last Updated:
अमरावती जिल्ह्याच्या तिवसा शहरात एका वडिलांनी आपल्या मुलाला आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
अमरावती जिल्ह्याच्या तिवसा शहरातून रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका वडिलांनी आपल्या मुलाला आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर कार घालून जीव घेण्याचा प्रयत्न केला. भीषण घटनेत सुनेच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असून, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेलसमोरच थरार, दोघे थोडक्यात बचावले
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सासरे जमा खान यांचे त्यांच्या कुटुंबासोबत कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून जमा खान यांनी हॉटेलसमोर उभी असलेली आपली चारचाकी गाडी वेगात आणून मुलगा आणि सुनेच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.ही गाडी थेट हॉटेल आणि कंपाउंडवर जाऊन धडकली, ज्यामध्ये हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून मुलगा आणि सून थोडक्यात बचावले, मात्र सून अश्विनी खान यांच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
ही संपूर्ण घटना हॉटेलच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामध्ये आरोपी कार थेट सून आणि मुलाच्या दिशेने येताना आणि धडकवताना स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
अमरावतीत अंगावर कार घालून मुलगा आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न pic.twitter.com/ZI4TVXEiYB
— News18 Marathi (@News18_marathi) June 23, 2026
या जीवघेण्या हल्ल्यानंतर पीडित सून अश्विनी खान यांनी तिवसा पोलीस ठाण्यात धाव घेत आपले सासरे जमा खान यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. अश्विनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जमा खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
दुसरीकडे, या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून वडील जमा खान यांनीही आपला मुलगा आझाद खान याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. मुलाने आपल्याला अश्लील शिवीगाळ केली आणि दगडफेक करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप वडिलांनी आपल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या तक्रारीचीही नोंद घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा दोन्ही बाजूंनी सखोल तपास करत आहेत.
Amravati,Maharashtra
Amravati: हॉटेलमध्ये कार घुसवली, मुलगा अन् सुनेला चिरडण्याचा प्रयत्न, धडकी भरवणारा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद
