शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा करताच ओमराजेंचं ठाकरे कुटुंबाबाबत मोठं विधान, उद्धव-बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत म्हणाले… – Marathi News | Dharashiv mp omraje nimbalkar comment on Thackeray family after announcement of joining shivsena


राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडला आहे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजेंनी पत्रकार परिषदेत शिवसेनेत जाण्याची माहिती दिली. यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे कुटुंबावर भाष्य केले आहे. ओमराजेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत आभार मानले आहेत.  ओमराजे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

ठाकरे कुटुंबावर काय म्हणाले ओमराजे?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर बोलताना ओमराजे म्हणाले की, ‘मी निश्चितपणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा स्नेह लाभला. आशीर्वाद लाभला. प्रेम लाभला. माझा कुणाबद्दल वाईट शब्द आला नाही. येणार नाही. सैनिकांना सांगितलं एकही शब्द चुकीचा जाऊ द्यायचा नाही. समोरून कोणतीही कमेंट आली तरी मातोश्रीवर काहीही बोलायंच नाही, चुकीचं बोलायचं नाही हे सांगितलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. मी सामान्य माणसांसाठी काम करत राहील.

शिवसेनेत जाण्याची घोषणा करताना ओमराजे काय म्हणाले?

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्ते लढत असताना, धाराशिवमध्ये एकाही पंचायत समितीत, नगरपालिकेत आपल्याला यश मिळाले नाही. सामान्य कार्यकर्ते चांगलं काम करणारे कार्यकर्ते वाईट पद्धतीने पराभूत झाले. मी असेन, सर्व सहकारी असेल 24 तास आम्ही सामान्य लोकांसाठी दिला. प्रामाणिक काम केलं. याचे साक्षीदार सर्वसामान्य माणसं आहेत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, आमचा कार्यकर्ता कधी कामात कमी पडला नाही. समस्या सोडवण्यात कमी पडलो नाही. सत्तेमुळे आम्हाला यश मिळालं नाही. पराभवाला सामोरे जावं लागलं. सामान्य माणसाच्या कामासाठी आम्ही बसलो आहोत. सामान्य माणसाच्या ट्रान्सफार्मरलाही अडचणी येत होत्या. सर्वांच्या माध्यमातून निर्णय घेतला की शिवसेना पक्षात जाणार आहोत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार आहोत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *