Last Updated:
लोकप्रिय अभिनेत्री एजे इर्तेम हिचे 35 व्या वाढदिवसानंतर अवघ्या एका दिवसात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्या अचानक मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
इस्तंबूल: लोकप्रिय अभिनेत्री एजे इर्तेम हिचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. तुर्कीत प्रसिद्ध असलेल्या एजेचा वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या एका दिवसात मृत्यू झाल्याने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तुर्कीतील लोकप्रिय टीव्ही मालिका क्रॅनबेरी सॉर्बे मध्ये ‘इशिल’ ही भूमिका साकारून एजे इर्तेम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार इस्तंबूलमधील आपल्या घरात आईसोबत असताना एजे इर्तेम अचानक बेशुद्ध पडली. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन वैद्यकीय पथक तिच्या घरी दाखल झाले आणि तिला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि सोमवारी दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
तिचे वकील उगुर गोक्कोयुन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, ही घटना तिच्या घरी घडली. ती त्या वेळी तिच्या आईसोबत होती. प्राथमिक तपासात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे दिसत आहे.
मृत्यूच्या अवघ्या एक दिवस आधी एजे इर्तेमने सोशल मीडियावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले होते. त्यामुळे तिच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘क्रॅनबेरी सॉर्बेट’ व्यतिरिक्त तिने मिस्टर रॉन्ग या रोमँटिक कॉमेडी मालिकेत तसेच अनेक ऐतिहासिक नाट्य मालिकांमध्येही काम केले होते.
तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोकसंदेशांचा पूर आला आहे. तिच्या विद्यापीठातील मित्र कागलार कुरू यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना म्हटले, माझ्याकडे शब्दच नाहीत. तिच्या हृदयात प्रेम, ऊर्जा आणि आनंद भरलेला होता. ही वेदना सहन करणे अत्यंत कठीण आहे.
तुर्की माध्यमांच्या वृत्तानुसार तिच्या मृत्यूपूर्वी मद्यपान आणि अँटीडिप्रेसंट औषधांच्या वापराबाबतही काही चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर तिच्या वकिलांनी आणखी एक धक्कादायक दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मृत्यूपूर्वी एजे इर्तेम थायलंड दौऱ्यावर गेली होती आणि तेथे एखाद्या संसर्गित माकडाच्या ओरखड्यामुळे तिला एखादा आजार झाला असण्याची शक्यता आहे.
वकील उगुर गोक्कोयुन यांनी सांगितले की, त्यांच्या क्लायंटने अलीकडेच थायलंडचा प्रवास केला होता. त्या काळात तिला एखाद्या जंगली माकडामुळे संसर्ग झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थायलंडमधील मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात आढळणारी मकाक प्रजातीची माकडे रेबीज आणि हर्पीससारखे संसर्गजन्य आजार पसरवू शकतात.
मात्र संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. मेहमेत जेहान यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते, उपलब्ध माहितीनुसार इतर वैद्यकीय कारणे अधिक संभाव्य वाटतात. तसेच मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही.
एजे इर्तेमवर तिच्या मूळ गावी आयदिन प्रांतातील येनिकॉय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अंत्यसंस्कारादरम्यान काही लोकांनी शवपेटीचे फोटो आणि व्हिडिओ काढल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून शोकाकुल कुटुंबीयांप्रती असंवेदनशील वर्तन केल्याबद्दल अनेकांनी संबंधितांवर टीका केली आहे. अभिनेत्रीच्या अचानक झालेल्या निधनामुळे तुर्की मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून तिच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी सर्वांचे लक्ष अधिकृत वैद्यकीय अहवालाकडे लागले आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 22, 2026 12:06 AM IST
वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू, 35व्या वर्षी आईसमोरच कोसळली, मनोरंजन विश्वात खळबळ
