Omraje Nimbalkar: धाराशीव लोकसभा मतदारसंघातील जीवाभावाच्या सर्व कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी सविस्तर चर्चा करून, सर्वांच्या सहमतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करूनही केवळ सत्तेअभावी पराभवाला सामोरे जावे लागले सर्वसामान्य माणसांची अगदी ट्रान्सफॉर्मर बसवण्यासारखी कामेही अडकून पडत होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी आणि त्यांची कामे मार्गी लावण्यासाठीच सत्तेत जाण्याचा हा निर्णय घेतला असल्याचे निंबाळकर म्हणाले.
पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही
ओमराजे यांनी सांगितले की, आपण कुठल्याही पैशाच्या किंवा पदाच्या हव्यासापोटी हा निर्णय घेतलेला नाही. अटी आणि शर्ती टाकून काम करणारा मी कार्यकर्ता नाही. राजेसाहेबांच्या हत्येचा खटला गेली 20 वर्षे सुरू होता, पण नुकताच आलेला निकाल अतिशय दुर्दैवी होता ज्याने कुटुंबाला पुन्हा दुःख दिले. या संदर्भात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्याशी बोलणे झाले असून, आपण फक्त न्याय मागत आहोत, कोणाची मेहरबानी नाही. त्यानुसार, सीबीआय आता हायकोर्टात या निकालावर अपील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही
त्यांनी पुढे सांगितले की, माझा कोणताही वेगळा व्यवसाय नाही ज्याला संरक्षण हवे आहे, किंवा माझ्यावर कोणतीही धाड पडलेली नाही. वाईट प्रवृत्ती राजकारणातून थांबवण्यासाठी जे काही करावे लागेल त्यासाठी मी कधीच थांबणार नाही. सत्तेचा उपयोग करून कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि बॅरेजेसची कित्येक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण केली जातील. नुसत्या घोषणा न करता ही कामे प्रत्यक्षात राबवून दाखवली जातील, असे त्यांनी सांगितले.
‘मातोश्री’बद्दल आणि ठाकरे कुटुंबाबद्दल आदर
आदरणीय उद्धवजी, आदित्यजी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचंड स्नेह आणि आशीर्वाद मला आजवर लाभला आहे. माझ्या किंवा माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या तोंडून ‘मातोश्री’बद्दल एकही वाईट शब्द निघणार नाही, अशी ताकीद आपण सर्वांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या बोलण्यापेक्षा मी घेतलेल्या या निर्णयाचे समर्थन माझ्या कामातून आणि कष्टातून लोकांना दाखवून देईन, असे त्यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?