भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या रेयांश बनेची ‘सुवर्ण हॅट्ट्रिक’! वयाच्या पाचव्या वर्षी गिनिज बुक नोंद, आता जिंकली सलग 3 गोल्ड मेडल


झारखंडची राजधानी रांची येथे पार पडलेल्या 12 व्या अखिल भारतीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा स्केटरने नवा इतिहास रचला आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या अवघ्या 10 वर्षांच्या रेयांश पराग बने याने राष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व कामगिरी करत सलग तीन दिवस तीन सुवर्णपदके (गोल्ड मेडल) पटकावली आहेत. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, तो राज्याचा एक उदयोन्मुख तारा म्हणून समोर आला आहे.

राष्ट्रीय स्तरावर सलग तीन दिवस तीन सुवर्णपदके….

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 9 ते 12 वयोगटासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून केवळ दोनच खेळाडूंची निवड झाली होती, ज्यामध्ये रेयांशचा समावेश होता. रांची येथे 16, 18 आणि 20 जून रोजी झालेल्या या स्पर्धेत रेयांशने आपल्या अफाट वेगाच्या आणि कौशल्याच्या जोरावर विरोधकांना थक्क केले. त्याने रोल लॅप, 100 मीटर आणि 500 मीटर अशा तिन्ही प्रकारांत सलग तीन सुवर्णपदके जिंकून सुवर्ण हॅट्ट्रिक साधली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल झारखंडच्या क्रीडा अधिकाऱ्यांच्या हस्ते त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.

वयाच्या पाचव्या वर्षी गिनिज बुकमध्ये नोंद

रेयांश सध्या नवी मुंबईतील ऐरोली येथील ‘युरो स्कूल’मध्ये इयत्ता पाचवीत शिकत आहे. अत्यंत लहान वयात त्याने स्केटिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी सलग 96 तास स्केटिंग करण्याचा जागतिक विक्रम त्याने केला होता, ज्याची नोंद ‘वर्ल्ड गिनिज बुक’मध्ये झाली आहे. आतापर्यंत त्याने म्हैसूर, केरळ, कलकत्ता, विशाखापट्टणम आणि झारखंड अशा विविध राज्यांत खेळून तब्बल 44 सुवर्ण, 15 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह एकूण 67 पदकांची कमाई केली आहे.

खेळाच्या मैदानासोबतच शाळेच्या सिनेटमध्येही दणदणीत विजय!

रेयांशने केवळ खेळाच्या मैदानातच नव्हे, तर शैक्षणिक आणि नेतृत्व क्षेत्रातही आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, 18 जून रोजी जेव्हा रेयांश रांचीमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यासाठी लढत होता, नेमक्या त्याच दिवशी त्याच्या ऐरोलीच्या शाळेत विद्यार्थी सिनेटची निवडणूक पार पडली.

रेयांश प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसतानाही, त्याच्या वर्गमित्रांनी आणि शिक्षकांनी त्याच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवून त्याचा उत्स्फूर्त प्रचार केला. विद्यार्थ्यांनी त्याला एकमुखी मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी केले. या विजयामुळे त्याची पाचवीच्या ज्युनियर सिनेट गटाच्या कॅप्टनपदी निवड झाली आहे. क्रीडा क्षेत्रातील सुवर्णयश आणि शालेय नेतृत्वाची जबाबदारी असा दुहेरी मुकुट रेयांशच्या शिरपेचात रोवला गेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

रेयांश हा देवरुख-संगमेश्वरचे माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू आणि मुंबईतील (भांडुप) युवा उद्योजक पराग बने यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे बने कुटुंबासह संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तो अभ्यासातही अत्यंत हुशार आणि हजरजबाबी असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi : 10 चौकार, 8 षटकार अन् 29 चेंडूंत 94 धावा! वैभव सूर्यवंशीचे वादळ, फायनलमध्ये श्रीलंकेचा गेम वाजवणारा ‘तो’ व्हिडिओ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *