Pune: बड्या घरात लेक दिली अन् नरक झालं आयुष्य, निवृत्त ACPची सुनेकडे शरीरसुखाची मागणी, नकार देताच… | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, अशा एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तानेच (ACP) आपल्या पदाचा आणि नात्याचा गैरवापर करत स्वतःच्या सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे.

Ai Generated Photo
Ai Generated Photo

पुणे शहरातून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, अशा एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तानेच (ACP) आपल्या पदाचा आणि नात्याचा गैरवापर करत स्वतःच्या सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने सुनेकडे चक्क शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा अत्यंत गंभीर आरोप पीडित विवाहितेनं केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात निवृत्त एसीपी, पीडितेचा पती, सासू आणि नणंदांसह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका ३० वर्षीय पीडित विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, तिचे सासरे आणि निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश रामचंद्र घाडगे यांनी तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. या कुकृत्याला विरोध केल्याने तिचा अतोनात मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.

केवळ सासऱ्यांकडूनच नाही, तर घरातील इतर सदस्यांकडूनही तिला सतत त्रास दिला जात होता. पीडितेचा पती, सासू आणि नणंदांकडून तिला वारंवार मारहाण केली जात होती आणि तिचा जाच केला जात होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झालेले आरोपी

पीडितेच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी सासरे निवृत्त एसीपी सुरेश रामचंद्र घाडगे, पती विक्रांत घाडगे, सासू सुनंदा सुरेश घाडगे, नणंद स्नेहल सर्जेराव, प्रवीण सर्जेराव, वैशाली राऊत आणि विक्रम राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने अशाप्रकारे सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

थाटामाटात लग्न अन् लाखो रुपयांचा खर्च

या प्रकरणातील पीडित विवाहितेचे वडील हे एका उच्च पदावरून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. ते राज्याच्या सचिवालयात सामान्य प्रशासन विभागातून उपसचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या एका मित्राच्या मध्यस्थीने विक्रांत घाडगे याचं स्थळ त्यांच्या मुलीसाठी आलं होतं. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने नोव्हेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विमाननगर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता.

त्यानंतर काही महिन्यांनी, म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये सासवड येथे या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे, या साखरपुड्याचा आणि विवाहाचा सर्व मोठा खर्च मुलीच्या पालकांकडूनच करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, लग्नात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचे मौल्यवान दागिनेही मुलीच्या कुटुंबीयांकडून सासरच्यांना देण्यात आले होते.

एवढे सर्व थाटामाटात करूनही सासरच्यांकडून सुनेचा अमानुष छळ करण्यात आल्याने हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरच असे गंभीर आरोप झाल्यामुळे पोलीस वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. सध्या कोंढवा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/

Pune: बड्या घरात लेक दिली अन् नरक झालं आयुष्य, निवृत्त ACPची सुनेकडे शरीरसुखाची मागणी, नकार देताच…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *