सध्या राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. देशभरात ऑपरेशन टायगरची चांगलीच चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टायगरमुळे शिवसेना ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. ठाकरे गटाने व्हीप जारी केल्यानंतर बोलवण्यात आलेल्या बैठकीला सहा खासदारांनी दांडी मारली. हे सहा खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव देखील आहे. याबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच तुळजापुरात त्यांच्या स्वागतचे बॅनर झळकले आहेत. हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
कुठे लावण्यात आले बॅनर?
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे ओमराजे निंबाळकर यांनी आपली अधिकृत राजकीय भूमिका जाहीर करण्यापूर्वीच त्यांच्या स्वागताचे मोठे बॅनर झळकू लागले आहेत. विशेष म्हणजे, ओमराजे निंबाळकर यांच्या कट्टर राजकीय विरोधक भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आले आहेत. शिंदे शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी हे बॅनर लावले असून, त्यावर “वाघ चालला वाघाच्या कळपात!” असा थेट संदेश देण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चांना उधाण आले आहे.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
दरम्यान, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ठाकरे गटाच्या नेतृत्वावर, विशेषतः आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली. महायुती सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात आणि प्रचंड मेहनत घेतात. उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणामुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी, आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय आणि मेहनती राहणे गरजेचे होते.”
पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या हा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा माझ्यावर मोठा दबाव आहे. मात्र, माझे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील कोर्टाच्या निकालानंतर सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून मी माझा अंतिम निर्णय २० जूननंतर जाहीर करणार आहे.”