वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप मोहिमेतील आपले पहिले 2 सामने जिंकून जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. या स्पर्धेतील सहभागी एकूण 12 संघांना 6-6 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 5-5 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तर गटातील 2 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. टीम इंडियाने सलग 2 सामन्यांसह उपांत्य फेरीतील दावा मजबूत केला आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेतील तिसरा सामना हा 21 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित आहे.
टीम इंडियात किती बदल होणार?
टीम इंडियाने नेदरलँड्सला पराभूत करुन ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमधील पहिल्या स्थानी झेप घेतली. आता टीम इंडियाकडे दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून विजयी हॅट्रिक करण्याची संधी आहे. मात्र टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये किमान 1 बदल कोणत्याही स्थितीत आणि करावाच लागणार आहे.
श्रेयांका पाटील आऊट
टीम इंडियाची युवा फिरकीपटू श्रेयांका पाटील हीला दुखापतीमुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित आहे.
श्रेयांका पाटीलला काय झालं?
श्रेयांकाला नेदरलँड्स विरूद्ध ओव्हरदरम्यान बॉलिंग करताना दुखापत झाली. श्रेयांकाचा बॉल अडवताना पाय मुरगळला. त्यामुळे श्रेयांका तीव्र वेदनेसह जमिनीवर पडली. फिजिओने येऊन श्रेयांकाची पाहणी केली. मात्र श्रेयांकाला दुखापतीमुळे तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे श्रेयांकाला स्ट्रेचरद्वारे मैदानाबाहेर न्यावं लागलं.
श्रेयांकाच्या जागी कुणाला संधी?
दरम्यान आता श्रेयांकाच्या जागी या स्पर्धेत प्रेमा रावत हीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रेमाला संधी दिली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वुमन्स टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा.