Omraje Nimbalkar Shivsena UBT धाराशिव : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. ठाकरेंची साथ सोडण्यासंदर्भात ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीमधे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीय दृष्ट्या योग्य आहे, असा त्यांचा सूर आहे. राजकीय अस्तित्वाचं संकट, विकासनिधीचा अभाव या सारखी कारणे निंबाळकर यांनी दिली आहेत. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याबाबतचा निर्णय 20 जून नंतर घेणार अस निंबाळकर यांनी म्हटलंय.
निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य : ओमराजे निंबाळकर
ओमराजे निंबाळकर यांनी भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार केला तर चुकीचा वाटतो मात्र राजकीय दृष्ट विचार केला तर बरोबर आहे, असं म्हटलं. ते पुढे म्हणाले की मी मोठ्या धर्म संकटात आहे. इमोशनली विचार केला तर पाऊल चुकीचे वाटते, पण पॉलिटिकल विचार केला तर तेच बरोबर आहे.
ओमराजे निंबाळकर म्हणाले की खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत व्यक्त केली. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदेसेनेत प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. मात्र वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या आणि वाय प्लस सुरक्षा मिळाल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचे सांगितले. हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
महायुती नेतृत्वाचे कौतुक, ठाकरे नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात असे सांगितले. तर उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणामुळे फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे मत ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी अजूनही माझा संपर्क झाला नसल्याचं म्हटलं.. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मी जात आहे, प्रमुख पदाधिकारी आम्ही जात असतो. उद्या मुंबईत आमदार, जिल्हाप्रमुख , संपर्कप्रमुख यांची बैठक बोलावली आहे. पक्षप्रमुख काय सूचना देतात त्यानुसार पुढील रणनीती असणार, असं कैलास पाटील म्हणाले.
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report