Zee Marathi: झी मराठीवरील आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता रोहित परशुराम ‘शंकर’ ही दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी ‘कमळी’ मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत रोहितने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. आता नव्या भूमिकेसाठी तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.
कशी मिळाली मालिकेत संधी?
या भूमिकेच्या तयारीबाबत रोहितने काही खास अनुभव शेअर केले आहेत. त्याने सांगितलं की, ही संधी त्याला अनपेक्षितपणे मिळाली. ” कमळी च्या सेटवर मी आदित्यला, म्हणजेच बंड्याला, सहज भेटायला गेलो होतो. त्यावेळी अनिकेत साने दिग्दर्शक झी मराठीवर नवीन मालिका घेऊन येत आहेत असं समजलं. आणि त्यांच्या नवीन मालिकेच्या ऑडिशन्स सुरू होत्या. मी लगेच सरांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक राऊंड्स ऑफ ऑडिशन्स झाले, सीन वर्क झालं आणि अखेर झी मराठीने मला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. मी कोल्हापुरी भाषा आणि त्याचा लहेजा शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्यासोबतच भरपूर व्यायाम, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या पाळतोय. स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्ले यांचं सखोल वाचन करतोय. साताऱ्यासोबत माझं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं आहे आणि या मालिकेचा मुहूर्तही साताऱ्यात झाला. त्यामुळे आनंद, उत्सुकता आणि भावुकता अशा अनेक भावना मनात घेऊन मी पहिल्या दिवसाचं शूटिंग केलं.”
ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफांची मुख्य भूमिका..
रोहितने यावेळी मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. त्याच्यासाठी हा अनुभव खूप खास असल्याचं त्याने सांगितलं. “ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत, त्या दिवशी मी अक्षरशः मारुतीरायाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की मला ही मालिका मिळू दे. ताईंच्या प्रोजेक्टमध्ये आपण फक्त हातात भाला घेऊन जरी उभे असलो, तरीही मला सार्थक झाल्यासारखं वाटलं असतं. त्यांच्यासोबत सेटवर वावरताना मला माझा संपूर्ण प्रवास आठवतो आणि खरंच मेहनतीला देव, फळ देतो . अशा दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबतचा प्रत्येक सीन माझ्यासाठी एक शिकण्याचा अनुभव असणार आहे.”
नवी कथा, दमदार कलाकार आणि भावनिक नात्यांची गुंफण असलेली ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ही नवी मालिका पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत. ‘कृष्णाईच्या लेकी’ दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष