नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवत नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनादुरुस्ती विधेयकासोबत मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक मंजूर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. कारण, एनडीएकडे लोकसभेत दोन तृतियांश बहुमत नव्हतं. त्यानंतर विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटले. तर, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात देखील फूट अटळ आहे. याच दरम्यान समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टी देखील फूटणार अशा चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीए दोन तृतियांश बहुमत गाठणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लोकसभेत भाजपकडे सध्या 240 खासदार आहेत. तर, एनडीएकडे 293 खासदार आहेत. भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा धक्का बसला होता. त्यावेळी जेडीयू, टीडीपी आणि जननायक जनता दलानं सत्ता स्थापनेस मदत केली होती.
लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी दोन तृतियांश बहुमत लागतं. लोकसभेतील 543 जागांनुसार 362 खासदारांची मतं आवश्यक असतात.नौगाव, बशीरहाट आणि शिलाँगच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळं दोन तृतियांश बहुमताची आकडेवारी 360 वर येते. टीएमसीच्या 20 खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटणार हे स्पष्ट झालंय. टीएमसीचे बंडखोर खासदार आणि ठाकरेंच्या सेनेचे फुटलेले खासदार यांनी एनडीएला पाठिंबा दिल्यास खासदारांचं संख्याबळ 319 होते. दुसरीकडे एम के स्टॅलिन यांच्या द्रमुकसोबत एनडीएचा संपर्क असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे लोकसभेत 22 खासदार आहेत. तामिळनाडूच्या निकालानंतर द्रमुक आणि काँग्रेसमधील अंतर वाढलं आहे. 22 खासदारांनी एनडीएच्या बाजूला गेल्यास त्यांचं संख्याबळ 341 होतं. एनडीएला दोन तृतियांश बहुमतासाठी 19 खासदारांची गरज राहते.
दरम्यान, तृणमूल काँग्रेस पक्षाचे 20 खासदार फुटले आणि त्यांनी एनसीपीआयमध्ये विलीन होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्या घडामोडी सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. अरविंद सावंत यांनी गटनेते म्हणून बोलावलेल्या बैठकीला सहा खासदार उपस्थित राहिले नाहीत.
ठाकरेंचे कोणते खासदार फुटण्याच्या मार्गावर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार?
1. अरविंद सावंत
2. अनिल देसाई
3. राजाभाऊ वाजे
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद