Mumbai BEST News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. बेस्टच्या बसगाड्यांचे चालक, वाहक तसेच वीज विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून, संपामुळे मुंबईतील बेस्ट बससेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज लाखो प्रवासी बेस्ट बसवर अवलंबून असतात, त्यामुळे उद्यापासून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
बेस्टच्या वीज विभागातील कर्मचारीही संपात सहभागी होणार
यासोबतच बेस्टच्या वीज विभागातील कर्मचारीही संपात सहभागी झाल्यास वीज देखभाल आणि संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संप टाळण्यासाठी प्रशासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र तोडगा न निघाल्यास मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आणि वीज सेवांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज मध्यरात्रीपासून बेस्ट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय कायम
दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय औद्योगिक न्यायालयाने आज संध्याकाळी बेस्टच्या बाजूने अंतरिम आदेश दिला आहे. बेस्टने दाखल केलेल्या ULP क्रमांक 190/2026 प्रकरणात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीशी संबंधित युनियनचे कर्मचारी आणि वेट लीज ऑपरेटर यांना 18 जूनच्या मध्यरात्रीपासून संप करण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. मात्र, कोर्टाचा आदेश आला असला तरी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीतील सदस्य आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती आहे. आज मध्यरात्रीपासून बेस्ट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय कायम असल्याचे समितीकडून सांगण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील युनियन सहभागी नसल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे आता मध्यरात्रीनंतर बेस्टची बससेवा आणि इतर सेवांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
बेस्ट प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेतल्याच आरोप
बेस्ट प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करीत, अशा धोरणांना पाठिंबा देणाच्या विरोधात सर्व कामगार संघटना आंदोलन करणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. प्रशासनाने 2016 पासून निवृत्त झालेल्या अनेक वीज कर्मचाऱ्यांना अद्याप ग्रॅच्युईटी दिलेली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही व्याजासह रक्कम देण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर 2016 ते 2021 या कालावधीसाठीचा वेतन कराराचे पालन न गेल्याने आणि सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतन लागू न केल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे समितीने नमूद केले.
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला