Last Updated:
पुणेकरांना गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची आणि मुसळधार पावसाची तीव्र प्रतीक्षा आहे. मात्र, ही प्रतीक्षा संपण्याऐवजी पुणेकरांसमोर आता निसर्गाचे एक नवे संकट उभे ठाकले आहे.
पुणे: पुणेकरांना गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची आणि मुसळधार पावसाची तीव्र प्रतीक्षा आहे. मात्र, ही प्रतीक्षा संपण्याऐवजी पुणेकरांसमोर आता निसर्गाचे एक नवे संकट उभे ठाकले आहे. पाऊस तर लांबच राहिला, पण सूर्याचा कोप आणि अंगाची लाही-लाही करणारा उकाडा आता आणखी तीव्र होणार असल्याने नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामानशास्त्र विभागाने पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवसांत थेट ‘उष्णतेच्या लाटेसदृश’ परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील उन्हाचा तडाखा पुन्हा एकदा कमालीचा वाढला आहे. बुधवारी पुण्यात तापमानाने मोठी झेप घेतली. सरासरीपेक्षा ५.७ अंश सेल्सिअसने जास्त म्हणजेच ३६.६ अंश सेल्सिअस कमाल आणि २४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दुपारी रस्त्यावरून फिरताना नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत असून, घामाच्या धारांमुळे उकाडा असह्य झाला आहे. संध्याकाळच्या वेळी काहीसा वारा सुटत असला, तरी घरांमधील गरम वाफा आणि उकाडा कमी होत नसल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत.
या वर्षी मे महिन्यात पुण्यात वळवाचा पाऊस अत्यंत कमी झाला. जून उजाडताच पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसतील आणि पुणेकरांना दिलासा मिळेल, अशी भाबडी अपेक्षा होती. मात्र, जूनचा पंधरवडा उलटला. १९ दिवस झाले तरी पुण्यात चक्क ‘शून्य’ पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गेल्या १९ दिवसांत जिल्ह्यात अवघा १३.९ मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात तब्बल ८३ टक्के पावसाची भीषण तूट नोंदवण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पुणे शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, केवळ संध्याकाळच्या वेळी अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, पुढील ४ ते ५ दिवस मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, असे ‘आयएमडी’ने स्पष्ट केले आहे. पावसाची ही हुलकावणी आणि येणारी उष्णतेची लाट पाहता पुणेकरांनी दुपारच्या वेळी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Pune,Maharashtra
Jun 18, 2026 10:16 AM IST
Pune Weather Alert: पुणेकरांनो, काळजी घ्या! पाऊस तर नाहीच, पण येतंय हे नवं संकट, हवामान विभागाचा इशारा
