Last Updated:
Sanchita Ugale Funeral: अभिनेत्री संचिताने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेनंतर संचिताच्या अंत्यसंस्काराचा एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ पाहून तुमचंही काळीज पिळवटून निघेल.
मुंबई: सध्या संचिता उगले मृत्यू प्रकरणाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरवले आहे. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि विकी कौशलच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटात झळकलेल्या संचिताने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरीही तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणारे अनेक पैलू सध्या समोर येत आहेत. संचिताने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेनंतर संचिताच्या अंत्यसंस्काराचा एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला असून, लेकीला अशा अवस्थेत पाहणाऱ्या आईचा हंबरडा पाहून तुमचेही काळीज पिळवटून निघेल.
१४ जूनला रविवारी संचिता तिच्या नालासोपाऱ्यातील घरी एकटीच होती. तिचे आई-वडील आणि १५ वर्षांची लहान बहीण काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत संचिताने बेडरूममधील पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावून घेतला. काही वेळाने जेव्हा तिची बहीण घरी परतली, तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. शेजाऱ्यांच्या मदतीने संचिताला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. ही बातमी समोर येताच सर्वांनाच मोठा धक्का बसला.
आईच्या आक्रोशाने वातावरणात पसरली शांतता
दरम्यान, सोशल मीडियावर संचिताच्या अंत्यसंस्कारावेळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये संचिताची आई तिला या अवस्थेत पाहून टाहो फोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. व्हिडिओमध्ये, संचिताचा पार्थिव देह जमिनीवर ठेवलेला दिसत आहे. बाजूला तिचे वडील, बहीण आणि नातेवाईक डोळ्यांत अश्रू आणून उभे आहेत. मात्र, आपली लाडकी लेक आता या जगात नाही, हे स्वीकारायला त्या माऊलीचे मन तयारच नव्हते. संचिताची आई तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर मायेने हात फिरवत तिला उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.
“ए संचू.. संचिता उठ ना गं.. मला एकदा ‘आई’ म्हणून हाक मार ना… ए बबड्या, तू असं का केलंस? माझ्यासोबत राहणार होतीस ना तू, मग मला सोडून का गेलीस?” आईच्या या आक्रोशाने आणि प्रश्नांनी तिथल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. तिथे उपस्थित असलेल्या पुरुषांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
संचिताच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या संचिताने करिअरची एवढी चांगली सुरुवात झाली असताना हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ अजूनही कायम आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील ताणतणावांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. पण या सगळ्यात, एका आईची हक्काची ‘बबडू’ कायमची शांत झाली आहे.
Mumbai,Maharashtra
